मुंबई पालिकेच्या १० शाळांमध्ये सीबीएसई बोर्ड ; नर्सरी ते सहावीपर्यंत एक तुकडी

मुंबई पालिकेच्या १० शाळांमध्ये सीबीएसई बोर्ड ; नर्सरी ते सहावीपर्यंत एक तुकडी

मुंबई महापालिका शाळेत शिकणार्‍या दुर्बल घटकातील गरीब विद्यार्थ्यांना अद्यावत आणि दर्जेदार शिक्षण असणार्‍या सीबीएसई बोर्डाच्या आणखी १० शाळा २०२१-२२ पासून सुरू करणार आहे. या शाळांमध्ये,नर्सरी, ज्युनियर केजी, सिनीयर केजी, पहिली ते सहावीपर्यंत प्रत्येक वर्गाची एक तुकडी असणार आहे.

यासंदर्भांतील प्रस्तावाला बुधवारी पालिका शिक्षण समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. याबाबतची माहिती शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी यांनी दिली आहे. मुंबई महापालिका इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या शाळा चालवते. तसेच, कनिष्ठ महाविद्यालय, ४ वैद्यकीय महाविद्यालयही चालवते. गरीब मुलांना दर्जेदार शिक्षण देताना त्यांची संख्या वाढावी यासाठी पालिका या विद्यार्थ्यांना २७ प्रकारच्या शालेय वस्तू मोफत देते.

हल्ली पालकांची इंग्रजी शाळांकडे ओढ असल्याने इतर माध्यमांच्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट होत आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक दुर्बल घटकांतील पालक ऐपत नसतानाही सीबीएसई, आयसीएसई मंडळाच्या शाळांमध्ये प्रवेश घेत आहेत. ही बाब विचारात घेऊन लोकप्रतिनिधी यांच्या मागणीनुसार व पालकांची ओढ पाहता महापालिकेने पालिकेच्या सीबीएसई मंडळाच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी जोगेश्वरीतील पूनम नगर येथे प्रायोगिक तत्वावर एक शाळा सुरू करण्यात आली आहे. तसेच, वरळीत आसीएसई बोर्डाची शाळा सुरू करण्यात आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या शाळांना पालकांकडून चांगला प्रतिसाद लाभल्याने इतर विभागातही अशा प्रकारच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या शाळांना पालिकेच्या इतर शाळांना देण्यात येणार्‍या सर्व प्रकारच्या सुविधा देण्यात येणार आहेत.

पालिका कर्मचार्‍यांच्या मुलांना संधी
सीबीएसई शाळांमधील ९० टक्के प्रवेश लॉटरी पद्धतीने तर ५ टक्के महापौरांच्या शिफारसीनुसार आणि ५ टक्के प्रवेश महापालिका कर्मचार्‍यांच्या मुलांसाठी राखीव ठेवले जाणार आहेत. या प्रवेशात आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना सर्वाधिक प्राधान्य देण्यात येणार आहे. पालिकेच्या १० शाळात शिशुवर्ग ते सहावीपर्यंत एकेक तुकडी सुरू करण्याचे ठरविण्यात आले आहे.

या ठिकाणी असणार शाळा
जी /उत्तर -: भवानी शंकर रोड शाळा
एफ / उत्तर -: कानेनगर, मनपा शाळा
के /पश्चिम -: प्रतीक्षा नगर मनपा शाळा
एल -: तुंगा व्हिलेज, नवीन इमारत
एन -: राजावाडी मनपा शाळा
एम / पूर्व -: अझीझ बाग मनपा शाळा
पी / उत्तर -: दिंडोशी मनपा शाळा
पी / उत्तर -: जनकल्याण नवीन इमारत
टी -: मिठानगर शाळा, मुलुंड
एस -: हरियाली व्हिलेज, मनपा शाळा विक्रोळी

First Published on: January 22, 2021 7:00 AM
Exit mobile version