वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी काळाची तिच्यावर झडप; क्रेन पडून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी काळाची तिच्यावर झडप; क्रेन पडून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

अंधेरी येथील क्रेन अपघातात फाल्गुनी पटेल यांचा मृत्यू झाला

गुजरातच्या भावनगर येथून बसने येणारे साड्यांच्या पार्सलची वाट पहाणाऱ्या २६ वर्षीय तरुणीचा मेट्रोचा गर्डर घेऊन जाणाऱ्या क्रेन (एक्सल पुलर)च्या अपघातात मृत्यू झाला. शनिवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास अंधेरी पूर्व गुंदवली बस थांब्याजवळ झालेल्या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणीचा आदल्यादिवशीच वाढदिवस साजरा करण्यात आला होता. तिच्या अशा अपघाती मृत्यूमुळे ती राहत असलेल्या परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

फाल्गुनी पटेल (२६) असे अपघातात ठार झालेल्या तरुणीचे नाव आहे. फाल्गुनी ही सकिनाक्यातील चांदीवली परिसरात कुटुंबासोबत राहत होती. एका खासगी कंपनीत नोकरी करणारी फाल्गुनीचा ३० ऑक्टोबर रोजी वाढदिवस होता. आदल्या दिवशी वाढदिवस साजरा करून शनिवारी सकाळी फाल्गुनी आपल्या चुलत बहीण तुलसी (३२) सोबत स्कुटीवरून गुजरात येथून येणारे साड्यांचे पार्सल घेण्यासाठी पश्चिम द्रुतगती महामार्ग अंधेरी पूर्व येथील गुंदवली बस थांब्यावर गुजरात येथून येणाऱ्या बसची वाट पहात होत्या.

त्याच वेळी जोगेश्वरी येथून दादरच्या दिशेने भरधाव वेगाने निघालेला मेट्रो-२ कामाचा गर्डर वाहून नेणारा एक्सल पुलर (क्रेन) या वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने एक्सल पुलरला जोडलेली ट्रॉली वेगळी होऊन फाल्गुनी हीच्या अंगावर पडली. ट्रॉली खाली दबली गेल्यामुळे फाल्गुणीचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातात फाल्गुणीची चुलत बहीण तुलसी ही जखमी झाली असून एक रिक्षा आणि स्कुटीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघातानंतर एक्सल पुलर चालक फरार झाला असून घटनास्थळी दाखल झालेल्या अंधेरी पोलिसांनी दुसऱ्या क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त ट्रॉली बाजूला करून फाल्गुणीचा मृतदेह ताब्यात घेऊन जखमी झालेल्या तुलसीला नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी अंधेरी पोलिसांनी पुलर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.

First Published on: October 31, 2020 7:25 PM
Exit mobile version