मुंबईच्या पावसाने मोडला ७ वर्षांचा रेकॉर्ड

मुंबईच्या पावसाने मोडला ७ वर्षांचा रेकॉर्ड

मुंबई शहरामध्ये गेल्या आठवड्यात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. विशेषत: शुक्रवार, शनिवार आणि रविवार या तीन दिवसांत पावसाने मुंबईला अक्षरश: झोडपून काढले. विशेष म्हणजे मागील आठवड्यात झालेल्या तूफान पावसाने गेल्या ७ वर्षांचा विक्रम मोडीत काढला आहे. यावर्षी १ जून ते १० जुलै दरम्यान कुलाबा आणि सांताक्रुझमध्ये झालेला पाऊस हा गेल्या ७ वर्षांमधला सर्वाधिक पाऊस असल्याचं, हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार यंदा सांताक्रुझमध्ये १ हजार ५४७ मिमी. तर कुलाब्यामध्ये १ हजार ३५६ मिमी. पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे यंदाच्या पावसामुळे मुंबईकर कुठेतरी सुखावला देखील आहे.

७ वर्षांतील लेखाजोखा

हवामान खात्याच्या अधिकृत वेबसाईटवर गेल्या ७ वर्षांतील पावसाचा लेखाजोखा मांडण्यात आला आहे. १ जून ते १० जुलै दरम्यान साल २०११ पासून ते २०१८ पर्यंत प्रत्येकवर्षी किती प्रमाणात पाऊन झाला याचा तपशील वेबसाईटवर देण्यात आला आहे. एक नजर टाकूया या आकडेवारीवर :

साल २०११
सांताक्रुझ – १ हजार १६ मिली मीटर
कुलाबा – ७५६ मिली मीटर
साल २०१२
सांताक्रुझ – ५९८.५ मिली मीटर
कुलाबा – ३८१ मिली मीटर
साल २०१४
सांताक्रुझ – ५५३ मिली मीटर
कुलाबा – ५५८ मिली मीटर
साल २०१५
सांताक्रुझ – १ हजार ११७ मिली मीटर
कुलाबा – ८७६.३ मिली मीटर
साल २०१६
सांताक्रुझ – १ हजार ४० मिली मीटर
कुलाबा – ७६९.१ मिली मीटर
साल २०१७
सांताक्रुझ – ७१३ मिली मीटर
कुलाबा – ५९४ मिली मीटर

तुळशी तलाव ओव्हरफ्लो

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी एक असलेला तुळशी तलाव भरून ओसंडून वाहत आहे. मुंबई आणि उपनगरांत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असून त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तुळशी तलावात मात्र वाढ झाली. गेल्या वर्षी हा तलाव १४ ऑगस्ट रोजी भरला होता. मात्र, यंदा जून आणि जुलै महिन्यातही दमदार पाऊस झाल्याने एक महिना आधीच तुळशी तलाव भरला. यंदा ५४ टक्के पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. शहरामध्ये एकत्रित केलेले पावसाचे पाणी अंदाजे ३७ हजार ५५० दशलक्ष लीटर इतके असून हे तुळशी आणि विहार तलावात झालेल्या ३५ हजार ७४४ दशलक्ष लीटरच्या साठवणी क्षमतेच्या बरोबरी इतके आहे. यंदाच्या पावसाळ्यात १०० टक्के सरासरी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. त्यानुसार ५४ टक्के म्हणजे अर्ध्याहून अधिक पाऊस पडल्याची माहिती समोर आली आहे.

 

First Published on: July 12, 2018 1:03 PM
Exit mobile version