bmc election : ओबीसी आरक्षणासाठी पुन्हा लॉटरी?, महापालिका आयुक्तांकडून आढावा बैठक

bmc election : ओबीसी आरक्षणासाठी पुन्हा लॉटरी?, महापालिका आयुक्तांकडून आढावा बैठक

मुंबई महापालिका निवडणुकीची  (Mumbai Municipal Corporation election) प्रक्रिया सुरू असताना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने निवडणूक विभागाने ओबीसीचे आरक्षण ( OBC reservation) वगळून ३१ मे रोजी आरक्षण सोडत लॉटरीद्वारे काढली. मात्र आता ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटण्याची शक्यता निर्माण झाली असून त्यासाठी हालचाली वाढल्या आहेत. त्याच अनुषंगाने जर ओबीसीला पूर्वीसारखे आरक्षण लागू झाल्यास ओबीसीच्या ६१ जागांसाठी लॉटरी सोडत कशी व कोणत्या पद्धतीने काढायची याबाबत बुधवारी पालिका आयुक्त इकबाल चहल (Iqbal Chahal), अतिरिक्त आयुक्त व निवडणूक विभागाचे अधिकारी यांच्यात महत्वपुर्ण बैठक झाल्याचे सूत्रांकडून समजते.

नगरसेवकांना धक्का बसणार

आता पुन्हा एकदा ‘ओबीसी’ चे आरक्षित प्रभाग लॉटरी सोडतीद्वारे ठरवली गेल्यास महिला व पुरुष खुले प्रभागातूनच ६१ प्रभाग निवडले जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तसेच, पालिकेच्या निवडणूक इतिहासात अशा प्रकारचा नवीन पायंडा पडणार आहे. तसेच, ज्या ज्या खुल्या वर्गातील माजी नगरसेवकांना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व महिला प्रभाग आरक्षित जागांच्या कचाट्यातून जो काही दिलासा मिळाला व त्यामुळे त्यांना जो काही आनंद मिळाला त्यात आता ओबीसी प्रभागासाठीच्या नवीन लॉटरी सोडतीमुळे कदाचीत विरजण पडू शकते. त्यामुळे त्या नगरसेवकांना मोठा धक्का बसणार आहे.

आग्रही मागणीमुळेच आढावा बैठक

मुंबई महापालिकेच्या २०२२ च्या निवडणुकीत २३६ प्रभागांपैकी ११८ प्रभाग महिला सर्वसाधारणसाठी, ११० प्रभाग खुले, अनुसूचित जाती – १५ प्रभाग ( त्यापैकी ८ प्रभाग महिलांसाठी आरक्षित), अनुसूचित जमातीसाठी २ प्रभाग ( त्यापैकी १ महिलांसाठी आरक्षित) असे आरक्षण जाहीर करण्यात आले. मात्र आता ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटण्याची शक्यता निर्माण झाल्याने खुल्या वर्गातील नगरसेवकांना ‘ टेन्शन’ येणार हे निश्चित. आता पुन्हा ओबीसी आरक्षण द्यायचे झाल्यास लॉटरी कशा प्रकारे काढली जाऊ शकते याबाबत पालिका आयुक्तांनी भाजपने ‘ओबीसी’प्रभाग आरक्षित करण्याबाबत घेतलेल्या आग्रही मागणीमुळेच आढावा बैठक घेतली असल्याचा दावा भाजपतर्फे आमदार आशिष शेलार यांनी केला आहे.

सत्ताधाऱ्यांचा रडीचा डाव – शेलार
‘ओबीसी’ साठी आरक्षण लागू झाल्यास आम्ही या प्रस्तावीत बदलाचे स्वागतच करु तसेच त्यासाठी पाठपुरावा सुरुच ठेवू, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी व्यक्त केली आहे. तसेच, ओबीसीला वगळून पालिकेने आरक्षण सोडत काढली असून आम्ही मात्र ओबीसी सोबत आहोत. वास्तविक, सत्ताधाऱ्यांचा वॉर्ड रचनेपासूनच रडीचा डाव सुरू असून काँग्रेसचा तर रडारडीचा डाव आहे. मात्र ओबीसीसाठीच्या लढाईत भाजपाचे कार्यकर्ते डगमगणार नाहीत. प्रत्येकवेळा पक्षाला जिंकून आणण्यासाठी लढतो, यावेळी आम्ही मुंबईकरांच्या विजयासाठी लढणार! भ्रष्टाचाराला हरवणार! है तयार हम, असे भाजपचे आमदार शेलार यांनी म्हटले आहे.

First Published on: June 1, 2022 10:26 PM
Exit mobile version