मुंबई महापालिका उभारणार वृद्धाश्रम, वृद्धांसाठी लवकरच नवीन धोरण

मुंबई महापालिका उभारणार वृद्धाश्रम, वृद्धांसाठी लवकरच नवीन धोरण

मुंबई शहर हे देशाच्या आर्थिक राजधानीचे व आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे. या शहराचा कारभार मुंबई महापालिका हाताळते. मुंबई महापालिका मुंबईकरांना पाणी, शिक्षण, आरोग्य, उद्याने, रस्ते आदी विविध सुविधा देते. अगदी फुटपाथवर राहणाऱ्या भटक्या लोकांसाठीही निवारास्थाने, कुष्ठरोग्यांसाठी उपचार व राहण्याची व्यवस्था, गतिमंद मुलांना शिक्षणाची सुविधाही पालिका देते. आता पालिकेतर्फे गोरेगाव ( पूर्व) येथील नेस्कोजवळ वृद्ध व्यक्तींसाठी १३ कोटी रुपये खर्चून वृद्धाश्रम उभारणार आहे. तसेच, लवकरच वृद्ध व्यक्तींना विविध सेवासुविधा देण्यासाठी लवकरच एक बहुउद्देशीय धोरण बनविणार आहे. त्यामुळे मुंबईतील वृद्ध व्यक्तीना मोठा दिलासा मिळणार आहे.

या कामासाठी पालिकेने टेंडर प्रक्रिया सुरू केली आहे. आरक्षित भूखंडावर वृद्धाश्रमाची तळमजला अधिक नऊ मजली इमारत पुढील एक ते दोन वर्षात उभारण्यात येणार आहे. यासंदर्भातील माहिती सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर (नियोजन) यांनी दिली आहे. वास्तविक, मुंबईसारख्या ठिकाणी वृद्ध लोकांना मायेचा व आपुलकीचा आधार देण्यासाठी मुंबई महापालिकेने सामाजिक दायित्वातून एक पाऊल पुढे टाकले आहे. गोरेगाव (पूर्व) येथे १३ कोटी रुपये खर्चून सर्व सेवासुविधांनीयुक्त वृद्धाश्रम  उभारत आहे. त्यामुळे दुःखी, कष्टी अशा वृद्धांना मोठा दिलासा मिळणार आहे. या वृद्धाश्रमात ७० वृध्द व्यक्तीसाठी व्यवस्था असणार आहे. मात्र, येेथील सेवा मोफत की माफक दरात हे वृद्ध व्यक्तींसाठी बनविण्यात येणाऱ्या धोरणा ठरविण्यात येणार आहे

या वृद्धाश्रमात वृद्धांना एकत्रित राहण्याची, वृद्ध जोडपे, एकटे वृद्ध व्यक्ती यांसाठी राहण्याची उत्तम सुविधा असणार आहे. वृद्ध व्यक्तीना विरंगुळा म्हणून मनोरंजन साधने, वाचनालय, कॅन्टीन आदींची सेवासुविधा असणार आहे. तसेच, या इमारतीत वृध्द व्यक्तींना आजारावर उपचार दिले जाणार आहेत.

वृद्धांसाठी धोरण व अंमलबजावणी

मुंबई महापालिका वृद्ध व्यक्तींना विविध सेवासुविधा देण्यासाठी लवकरच एक बहुउद्देशीय धोरण बनविणार आहे. त्यासाठी मुंबईच्या विकास आराखड्यात तशी तरतूदही करण्यात आली आहे. सदर धोरण तयार होईपर्यंत पालिकेने वृद्धआश्रम उभारणीच्या कामाला म्हणजे टेंडर प्रक्रियेला फेब्रुवारी २०२२ मध्येच सुरुवात केली होती. मात्र २१.०९ बिलो दर आल्याने पालिकेने टेंडर प्रक्रिया पुन्हा राबवली आहे. एकदा वृद्धांसाठी धोरण कागदावर तयार झाले व त्यास प्रशासकीय मंजुरी मिळाली की त्यावर तात्काळ अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

First Published on: May 20, 2022 8:29 PM
Exit mobile version