मुंबईच्या सुरक्षिततेसाठी एकच प्राधिकरण; पुढील ५० वर्षांचे नियोजन आवश्यक – आदित्य ठाकरे

मुंबईच्या सुरक्षिततेसाठी एकच प्राधिकरण; पुढील ५० वर्षांचे नियोजन आवश्यक – आदित्य ठाकरे

मुंबईचे वादळवारा, अतिवृष्टी, पूरस्थिती, ग्लोबल वॉर्मिंग यांपासून संरक्षण होण्यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शन व एकच प्राधिकरण यांच्या मार्फत पुढील ५० वर्षांचे नियोजन करणे आवश्यक असल्याचे मत पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. मुंबईसह जगभरात ग्लोबल वॉर्मिंगमुळे ऋतू बदल, हवामान बदल होऊन त्याचा विपरीत परिणाम होत आहे. मुंबईत कधी नव्हे ती भयंकर स्वरूपाची वादळे धडकत आहेत. कधी उष्णता वाढते तर कधी कडाक्याची थंडी पडते. पावसाळ्यात अतिवृष्टी होऊन सखल भागात पाणी साचून पूरस्थिती निर्माण होत आहे. त्याचा मुंबई शहरावर, जनजीवनावर व एकूणच मुंबईकरांवर विपरीत परिणाम होत आहे. मुंबईत विविध प्राधिकरणे यांच्यातील समन्वयाचा अभाव पाहता मुंबईच्या सुरक्षिततेसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे, एकच प्राधिकरण असणे आणि पुढील ५० वर्षांसाठी ठोस व दीर्घकालीन नियोजन करणे आवश्यक आहे, असे मत राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.

मुंबईतील पूर जोखीम व व्यवस्थापन संदर्भात विचारमंथन करण्यासाठी मुंबई महापालिका व वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट इंडिया या संस्थेच्या सहकार्याने सह्याद्री अतिथीगृह येथील सभागृहात २८ व २९ एप्रिल रोजी दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचा शुभारंभ राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आला.

यावेळी, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू, प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) अशोक मेस्त्री, मुंबई महापालिका आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे संचालक महेश नार्वेकर, वरिष्ठ अधिकारी, पर्यावरण तज्ञ, विविध सामाजिक, शैक्षणिक संस्था यांचे तज्ञ, अभियंते, प्रतिनिधी हे उपस्थित होते. ग्लोबल वॉर्मिंग, हवामान, ऋतू बदल, पूरस्थिती यांचा मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शहराला चांगलाच फटका बसत आहे. मुंबईची लोकसंख्या , वाढते शहरीकरण, वाढती रहदारी, प्रदूषण, पावसाळ्यात निर्माण होणारी पूरस्थिती हे पाहता मुंबईच्या सुरक्षिततेबाबत ठोस व दीर्घकालीन उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे, असे मत पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केले.

मुंबईत एकीकडे झपाटयाने विकासकामे होत आहेत. मातीची मैदाने कमी होऊन उंच इमारती, सिमेंटचे रस्ते वाढत आहेत. त्यामुळे पाणी जमिनीत मुरत नाही. ते पाणी नद्या, नाले यांना जाऊन मिळते. त्यातच ग्लोबल वॉर्मिंगमुळे काही बदल होत आहेत. वाढत्या शहरीकरणात १९८० पासून ते आजपर्यंत मुंबईतील हरित पट्टे कमी झाले आहेत. मार्च, एप्रिल महिन्यात कडाक्याची उष्णता जाणवते.गेल्या २-३ वर्षात मुंबईत वादळे धडकली. फेब्रुवारी महिन्यात कडाक्याची थंडी पडून स्वेटर घालावे लागले होते. हवामान खात्याकडून पुढील तीन तासाचे अंदाज येतात मात्र पुढील तीन दिवसाचे अंदाज येत नाहीत. त्यामुळे अशा परिस्थितीत मुंबईच्या सुरक्षिततेबाबत विचारमंथन करणे, उपाययोजना करणे आवश्यक झाले आहे.

मुंबई महापालिका सर्वतोपरी उपाययोजना करीत आहे. मात्र मुंबईत एखादा रस्ता बनवायचा असेल तर जमिनीखालील ४३ युटिलिटी हटविणे व त्यासाठी त्यांची परवानगी घ्यावी लागते. तसेच मुंबईत म्हाडा, एमएमआरडीए, रेल्वे अशी १६ विविध प्राधिकरणे असून त्यांच्यात समन्वयाचा अभाव जाणवतो. त्यामुळे मुंबईच्या सुरक्षिततेसाठी एकच प्राधिकरण असणे आणि किमान ५ वर्षांसाठी नव्हे तर पुढील ५० वर्षांसाठी ठोस व खास नियोजन करणे आवश्यक आहे, असे मत मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले.

गुरुवारी पहिल्या दिवशी पार पडलेल्या सत्रात प्रारंभी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी, मुंबईतील भौगोलिक स्थिती, हवामान, पावसाचे प्रमाण, पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता, पावसाळ्यात पाणी साचणारी ३८६ ठिकाणे, पूरस्थिती रोखण्यासाठी पालिकेने आतापर्यंत केलेल्या विविध उपाययोजना, यापुढे हिंदमाता, मिलन सब वे, किंग्जसर्कल आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात साचणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी सहा ठिकाणी उभारलेले मोठे पंपिग स्टेशन, मोगरा व माहुल या ठिकाणी आणखीन दोन पंपिंग स्टेशन प्रस्तावित असणे, मिनी पंपिंग स्टेशन उभारणी, तांत्रिक अडचणी, नद्या, नाले या ठिकाणी असलेली अतिक्रमणे व यासर्वांवरील उपाययोजना यांबाबत सविस्तर माहिती दिली.

मुंबईची भौगोलिक स्थिती, पर्जन्य जलवाहिन्यांची कमी क्षमता पाहता अशा स्थितीत जर मुंबईत अतिवृष्टी झाली व त्याचवेळी समुद्रातील मोठी भरती असेल तर मुंबईतील काही सखल भागात काही तास पावसाचे पाणी साचणारच.पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता वाढविणे, पंपिंग सिस्टीम वाढविणे, भूमिगत टाक्या बांधून त्यामध्ये पावसाचे पाणी साठवून मग त्याचा निचरा पंपिंग स्टेशनमार्फत करणे, नद्या, नाले यांचे खोलीकरण, रुंदीकरण करणे आदी उपाययोजना पालिकेमार्फत करण्यात येत असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी सादरीकरणाद्वारे यावेळी दिली.

गुरुवारी पहिल्या सत्राअंतर्गत, मुंबईतील पूर व्यवस्थापनासाठी तांत्रिक अद्ययावतीकरण, पूरस्थितीमुळे मुंबईत संभाव्य धोक्यांचे मूल्यमापन, मुंबईत पूरस्थितीवर मात करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना याबाबत तज्ज्ञांनी विचारमंथन व मार्गदर्शन केले.


ई- स्कूटरची बॅटरी ठरतेय चालकाच्या मृत्यूचे कारण; भारतात ई-स्कूटर वादाच्या भोवऱ्यात

First Published on: April 28, 2022 2:23 PM
Exit mobile version