मुंबईच्या झोपडपट्टी परिसरात राबवणार ‘कुष्ठरोग शोध मोहिम’!

मुंबईच्या झोपडपट्टी परिसरात राबवणार ‘कुष्ठरोग शोध मोहिम’!

कुष्ठरोग आजाराचे जीवाणू

कुष्ठरोग या आजाराचं समुळउच्चाटन व्हावं यासाठी पुन्हा एकदा पुढाकार घेण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर येत्या २५ सप्टेंबरपासून मुंबईतील झोपडपट्टी परिसरात ‘कुष्ठरोग शोध मोहिम’ राबवण्यात येणार आहे. जर एखाद्या व्यक्तीला कुष्ठरोग झाला असेल तर त्याचं लवकरात लवकर निदान होऊन त्यांना तात्काळ उपचार मिळावेत यासाठी ही मोहिम राबवण्यात येत आहे. खरंतर, कुष्ठरोग हा बरा होणारा आजार‌ आहे, त्यामुळे या आजाराविषयी कुठल्याही प्रकारची भीती बाळगण्याची गरज नसल्याचं मत पालिकेच्या आरोग्य कार्यकारी अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी व्यक्त केलं आहे.

२५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर दरम्यान मोहिम

येत्या २५ सप्टेंबर ते १० ऑक्टोंबरपर्यंत ही मोहिम मुंबईच्या झोपडपट्टी परिसरात राबवण्यात येणार आहे. या मोहिमेत एकूण ४७ लाख १८ हजार ७०० लोकांची घरोघरी जाऊन तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी २ हजार ९९६ सी. एच. व्ही. आणि स्वयंसेवक सर्वेक्षण टीम असणार आहेत. तसंच या टीममध्ये कुष्ठबाधित व्यक्तींचा देखील समावेश करण्यात आला आहे. प्रत्येक टीम दरदिवशी २५ घरांचे सर्वेक्षण करणार आहे. शिवाय दोन कॉलेजमधील विद्यार्थ्यांना या मोहिमेत सहभागी केलं जाणार आहे. या मोहिमेसाठी ८४ लाख राज्य सरकारकडून आणि १८ लाख पालिकेकडून अनुदान देण्यात आलं आहे. मुंबई जिल्ह्याची लोकसंख्या एक कोटी ३७ लाख एवढी असून दर १० हजारांत कुष्ठरोगाचं प्रमाण ०.२२ टक्के इतकं आहे.

कुष्ठरोगाला शून्यावर नेण्याचा प्रयत्न

एप्रिल ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत आतापर्यंत १९५ कुष्ठरोग बाधित व्यक्ती आढळल्या आहेत. त्यामुळे जर गेल्या १० वर्षांची आकडेवारी पाहिली तर ही संख्या कमी झाली आहे. ती शून्यावर आणण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं डॉ. पद्मजा केसकर यांनी स्पष्ट केलं आहे.

गेल्या दहा वर्षांच्या आकडेवारी

First Published on: September 19, 2018 7:15 PM
Exit mobile version