मुंबईत जमावबंदी

मुंबईत जमावबंदी

मुंबईत करोना रुग्णांची संख्या वाढत चालल्याने मुंबई पोलिसांनीही महत्त्वाची पावले उचलली आहेत. करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी रविवारी मुंबईत जमावबंदी आदेश लागू केली आहे. गर्दीमुळे करोनाचा संसर्ग होत असल्याने नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी यासाठी पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. तसेच शहरात आयोजित करण्यात येणार्‍या मुंबई दर्शनसारख्या सर्व प्रकारच्या सहलींवरही बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, देश भरातील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या 107 झाली असून त्यात महाराष्ट्रातील 33 जणांचा समावेश आहे.

करोनाचा विळखा अधिक घट्ट होत असताना मोठे समारंभ, गर्दी आणि अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन मुंबई पोलिसांनी मुंबईकरांना केले आहे. तसेच पाच पेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमू नये, असे मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले. जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख हे गृहखात्याशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.
तसेच मुंबईत निघणार्‍या सर्व सहली रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबईत येणार्‍या पर्यटकांसाठी मुंबई दर्शन सहली आयोजित करण्यात येतात. मात्र करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता या सहली रद्द करण्याचे आदेश पोलिसांनी सर्व सहल आयोजकांना दिले आहेत. त्यामुळे रविवारी मुंबईत एकही मुंबई दर्शन सहल निघाली नाही.

मुंबईत करोनाचे पाच रुग्ण आढळल्याने राज्य सरकारने मुंबईतील सिनेमा थिएटर्स, जिम आणि स्विमिंग पूल बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कोणत्याही राजकीय, सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी न देण्याचा आणि ज्यांना यापूर्वी परवानगी दिली आहे, त्यांची परवानगी रद्द करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तसेच मॉल आणि गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचे आणि विनाकारण प्रवास करणे टाळण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली                                                                                          राज्यात होणार्‍या एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. एमपीएससीची परीक्षा ३० मार्चनंतर घेण्याची सूचना राज्य सरकारने संबंधितांना केली आहे.

सर्व शुटींग रद्द करण्याचा निर्णय                                                                                              येत्या गुरुवारपासून 31 मार्चपर्यंत सिनेमा, छोटा पडदा, वेबसिरीज, जाहिराती या सर्व मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घटकांचे संपूर्ण शुटींग रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

रुग्णांवर बहिष्कार घातल्यास कारवाई
करोना रुग्णांच्या नातेवाइकांशी कोणी भेदभाव, दुजाभाव किंवा त्या रुग्णावर आणि त्याच्या कुटुंबियांवर बहिष्कार टाकल्यास पोलीस कारवाई करण्यात येणार आहे.

गावाकडे जाणार्‍या बसेसना गर्दी                                                                                              मुंबई, पुणे यांसारख्या शहरांमध्ये करोना पसरत असल्यामुळे लोक गावाकडे निघाली आहेत. त्यामुळे शहरातून गावाकडे जाणार्‍या एसटी, खाजगी बसेसना गर्दी होत आहे.

राज्यातील मंदिरांमधील गर्दी ओसरली                                                                                        महाराष्ट्रातील शिर्डी, कोल्हापूरचे अंबाबाई मंदिर, अक्कलकोट आणि मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरातील गर्दी ओसरलेली दिसत आहे. यंदा कोरोनाच्या भीतीने गर्दी ओसरलेली आहे.

शिर्डीत साई परिक्रमा; आयोजकांवर गुन्हे                                                                                        सर्व प्रकारच्या कार्यक्रमांवर सरकारने बंदी घातलेली असताना शिर्डीत रविवारी पहाटे साई परिक्रमा उपक्रम झाला. त्यामुळे आयोजकांवर गुन्हा नोंदवला आहे.

अंगणवाड्या ३१ मार्चपर्यंत बंद                                                                                                  पुणे जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका, सर्व नगरपालिका व सर्व नगरपंचायत क्षेत्रातील अंगणवाड्या ३१ मार्च २०२० पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत.

First Published on: March 16, 2020 7:01 AM
Exit mobile version