मुंबई पोलिसांची ई-सायकल पँडल न मारताही ३ तास पळणार

मुंबई पोलिसांची ई-सायकल पँडल न मारताही ३ तास पळणार

मुंबई पोलिसांच्या ताफ्यात आलेली जबरदस्त ई सायकल

मुंबई पोलीस म्हटलं की डोळ्यासमोर येते निळी-पिवळी क्वालिस किंवा फटफट आवाज करत पळणारी बुलेट. मात्र आता हे चित्र थोडे बदलणार आहे. तुमच्या विभागात, गल्लीत चक्क पोलीस सायकलवरून फिरताना दिसणार आहे. बॅटरीवर चालणाऱ्या ‘ई सायकल’ लवकरच मुंबई पोलिसांच्या ताफ्यात जमा होणार आहेत. या सायकलवरून पोलीस आता गस्त घालताना किंवा एखादवेळेस गुन्हेगारांचा पाठलाग करताना आपल्याला दिसेल. इंधन बचतीसोबतच पर्यावरण जतन करण्याचाही एकप्रकारे यातून संदेश जाईल. विशेष म्हणजे मुंबई पोलिसांच्या ताफ्यात येणाऱ्या या ई सायकल पेंडल न मारताही तीन तास चालू शकणार आहे. तसेच या सायकलचा वेग प्रतितास २५ किलोमीटर इतका आहे.

आता मुंबई पोलीस ई सायकलवर “धूम मचाले”

मुंबई पोलिसांना लवकरच या सायकल चालवण्यासंबंधी प्रशिक्षण दिले जाणार आहे. मुंबईच्या छोट्या छोट्या गल्लीबोळात मोटारसायकल नेणे अशक्य होते. अशा काही भागामध्ये ई-सायकलने आरामात जाता येईल, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या सायकलची बॅटरी उतरल्यानंतर पुन्हा चार्ज होण्यासाठी एक तास घेते. विशेष म्हणजे बॅटरी संपल्यानंतरही पँडल मारून सायकल चालवता येणे शक्य आहे. जेव्हा वेगात जाण्याची गरज आहे, तेव्हा बॅटरीवर सायकल पळवता येईल.

सायकलवरून गस्त घालण्याचा प्रयोग मागच्यावर्षी दिल्ली येथे झाला होता. गल्लीबोळात अनेक ठिकाणी छोटे छोटे गुन्हे होत असतात. अशा ठिकाणी पोहोचण्यासाठी दिल्ली पोलिसांनी ६५ सायकल शिपायांना दिल्या होत्या. मात्र त्या पारंपारिक सायकल होत्या. मुंबई पोलिसांनी मात्र एक पाऊल पुढे टाकले आहे. मुंबई पोलिसांनी आपल्या ताफ्यात थेट बॅटरीवर चालणाऱ्या सायकल आणल्या आहेत. त्यामुळे वेगात पाठलाग करायचा झाल्यास, ते शक्य होईल.

First Published on: February 9, 2019 4:04 PM
Exit mobile version