CoronaVirus : मुंबईच्या वांद्रे परिसरातून १५ कोटींचे मास्क जप्त!

CoronaVirus : मुंबईच्या वांद्रे परिसरातून १५ कोटींचे मास्क जप्त!

प्रातिनिधिक छायाचित्र

एकीकडे राज्यात करोनाचा फैलाव सुरू झालेला असताना आणि मुंबईत करोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असताना दुसरीकडे करोनाला आळा घालण्यासाठी आवश्यक असलेल्या मास्कची मोठ्या प्रमाणावर साठेबाजी सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. याआधी देखील अनेक ठिकाणी मास्क, सॅनिटायझर्स यांची साठेबाजी झाल्याची प्रकरणे उघडकीस आली होती. त्यावेळी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अशा साठेबाजावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर आज मुंबईमध्ये मास्कचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. सुमारे २५ लाख मास्क ताब्यात घेण्यात आले असून मुंबई पोलिसांची साठेबाजांवर ही मोठी कारवाई मानली जात आहे.

मास्कची किंमत १५ कोटींच्या घरात!

मुंबईच्या वांद्रे परिसरामध्ये पोलिसांनी सकाळच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार छापा टाकला. यावेळी तब्बल २५ लाख मास्क लपवून ठेवल्याचं समोर आलं. या मास्कची किंमत सुमारे १५ ते २० कोटींच्या घरात आहे. या ठिकाणाला स्वत: गृहमंत्री अनिल देशमुख ११ वाजता भेट देणार असल्याचं समजतंय. अशा प्रकारे साठेबाजी न करता लोकांना मदत करावी आणि करोनाविरोधातल्या लढ्यासाठी एकत्र यावं असं आवाहन वारंवार प्रशासनाकडून केलं जात आहे.

नवी मुंबई एपीएमसी मार्केट उद्यापासून ३१ मार्चपर्यंत बंद!

दरम्यान, आज संचारबंदीचा राज्यातला दुसरा दिवस असून नवी मुंबईतल्या एपीएमसी मार्केटमध्ये आजचा दिवसच भाजीपाला आवक होणार आहे. उद्यापासून पुढचा एक आठवडा म्हणजेच ३१ मार्चपर्यंत भाजीपाल्याची आवक बंद राहणार आहे. एपीएमसी व्यापारी समितीकडून हा निर्णय कालच घेण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये मोठी गर्दी झाली असून उद्यापासून मुंबईत भाजीपाल्याची काहीशी कमतरता जाणवण्याची शक्यता आहे.


हेही वाचा – CoronaVirus: आता घरोघरी जाऊन करोना चाचणी करणार!
First Published on: March 24, 2020 9:42 AM
Exit mobile version