Corona : मुंबई पोलिसांसाठी पोलीस आयुक्तांचा महत्त्वपूर्ण निर्णय!

Corona : मुंबई पोलिसांसाठी पोलीस आयुक्तांचा महत्त्वपूर्ण निर्णय!

प्रातिनिधिक छायाचित्र

कोविड १९ या साथीच्या रोगाने देशभर थैमान घातले असून मुंबई पोलिस दलातील अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना या साथीच्या रोगाची लागण झाली आहे. या साथीच्या विरुद्ध लढा देण्यात मुंबई पोलीस आघाडीवर आहेत. मात्र, अशा परिस्थितीमध्ये रस्त्यावर उतरून ड्युटी करताना काही पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यातच २ पोलिसांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू देखील ओढवला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांच्या सुरक्षेसाठी पोलीस आयुक्तांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे ५५ वर्षांवरील पोलीस ज्यांना वयामुळे कोरोनाचा धोका अधिक आहे, अशा पोलिसांना ड्युटीवर न येता घरीच थांबवण्याची मुभा देण्यात आली आहे.

मुंबई पोलिस दलाच्या आरोग्यासाठी खालील पावले उचलली जात आहेत…

१) ५५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व कर्मचार्‍यांना घरीच राहण्यास सांगितले आहे.

२) मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादींसारखा आजार असणाऱ्या ५२ वर्षांवरील सर्व कर्मचार्‍यांनाही घरी रहाण्यास सांगितले गेले आहे.

३) ३ एप्रिल २०२० पर्यंत पोलीस ठाण्यातील इतर कर्मचारी १२ तास ड्युटी आणि २४ तास विश्रांती अशा शिफ्टमध्ये कार्यरत असतील.

४) वैद्यकीय सल्ल्यानुसार १२ हजार जवानांसाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन टॅबलेट पुरविल्या जात आहेत.

५) प्रतिकारशक्ती चांगली करण्यासाठी २० हजार जवानांना मल्टीविटामिन आणि प्रथिनांनी पूरक आहार पुरवला जात आहे.

६) पोलीस कर्मचाऱ्यांसाठी विशेष रुग्णालये नियुक्त केली जात आहेत. तसेच मुंबईतील सर्व कोविड रुग्णालयांनी मुंबई पोलिस कर्मचाऱ्यांसाठी बेड देऊ केले आहेत.

७) कोविड -१९ संबंधित शंका किंवा अडचणी दूर करण्यासाठी नियंत्रण कक्षात पोलिस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांकरता विशेष कोविड हेल्पलाईन क्रमांक तयार केला आहे. वैद्यकीय व्यावसायिकांना देखील ही हेल्पलाईन उपलब्ध असेल.

८) सर्व पोलीस कर्मचार्‍यांना पुरेशा प्रमाणात पीपीई, फेस मास्क, हँड सॅनिटायझर्स, हातमोजे, फेस शिल्ड पुरविल्या गेल्या आहेत.

९) खाद्यपदार्थांची पाकिटे, रेशन, गरम पाण्याचे फ्लास्क, चेकपॉईंटवरील पंडाळे इत्यादी सुविधा कर्तव्यावर असणाऱ्या सर्व कर्मचार्‍यांना दिल्या जात आहेत.

१०) इच्छुक सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणीच राहण्याची सोय उपलब्ध करुन दिली जात आहे.

११) कोविड १९ शी लढताना आपला प्राण गमावणाऱ्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना शासनाने ५० लाख रुपये मंजूर केले आहेत. तसेच, त्यांच्या घरातील एकाला नोकरी देण्याचं देखील मान्य केलं आहे.

First Published on: April 28, 2020 3:25 PM
Exit mobile version