मुंबईत पहिल्याच पावसात रस्ते, रेल्वे वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे हाल

मुंबईत पहिल्याच पावसात रस्ते, रेल्वे वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे हाल

मुंबईसह राज्यात पावसाची संततधार सुरूच, अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प,पूरस्थितीमुळे पुढील पाच दिवस सावधानतेचा इशारा

हवामान खात्याने ९ ते १२ जून कालावधीत मुंबईसह कोंकणात अतिवृष्टीबाबत दिलेल्या इशाऱ्यानुसार बुधवारी पहाटे पासून कोसळणाऱ्या पहिल्याच मुसळधार पावसामुळे मुंबईतील कुर्ला – सायन रेल्वे मार्गावर पाणी साचल्याने मध्य रेल्वे व हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली.कुर्ला ते सीएसएमटी  आणि कुर्ला वाशी रेल्वे सेवा बंद पडली आहे. तर हिंदमाता, किंग्जसर्कल, अंधेरी सब वे , सायन आदी सखल भागात वीतभर ते हातभर पाणी साचल्याने रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली.

तसेच, या पहिल्याच पावसात पालिका व रेल्वे प्रशासन यांनी केलेल्या नालेसफाईच्या कामांची पोलखोल झाली आहे. एकूणच पहिल्याच पावसात मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. विषेश म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असताना पहिल्याच मुसळधार पावसामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांना रुग्णालये, कोविड जंबो सेंटर आदी ठिकाणी वेळेत पोहोचता न आल्याने त्याचा अत्यावश्यक सेवेवर काहीसा परिणाम झाल्याचे दिसून आले आहे.

मंगळवारी रात्रीपासून रिमझीम कोसळणाऱ्या पावसाने बुधवारी पहाटे ५ वाजल्यापासून चांगलाच जोर धरल्याने मध्य रेल्वेच्या कुर्ला – सायन रेल्वे मार्गावर गुडघाभर पाणी साचल्याने मध्य रेल्वे व हार्बर रेल्वेची वाहतूक सकाळी ९.५० वाजल्यापासून बंद ठेवण्यात आली. त्यामुळे लोकल ट्रेनमध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी अडकून पडले. त्यांचे काही प्रमाणात हाल झाले. त्यामुळे अत्यावश्यक सेवेवर परिणाम झाला.

हिंदमाता, किंग्जसर्कल आदी सखल भागात गुडघाभर पाणी साचले

मुंबईत ९ ते १२ जून या कालावधीत चार दिवस अतिवृष्टी होणार असल्याचा पूर्व इशारा हवामान खात्याकडून दोन दिवस अगोदरच देण्यात आला होता. हिंदमाता, किंग्ज सर्कल , कुर्ला, घाटकोपर, माटुंगा, अँटॉप हिल, दादर, परळ, भायखळा, सायन, अंधेरी सब वे, मालाड सब वे आदी काही सखल भागात वीतभर ते गुडघाभर पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीवर परिणाम होऊन काही ठिकाणी वाहतूक अन्य पर्यायी मार्गाने वळविण्यात आली. तर नागरीकांनाही साचलेल्या पाण्यामधून कामासाठी घराबाहेर पडावे लागले.

तसेच, पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर मुसळधार पावसामुळे वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे अत्यावश्यक सेवेवर परिणाम झाला आहे.

नालेसफाई कामाची पोलखोल

मुंबई महापालिकेने पावसाळ्यापूर्वी १०४% नालेसफाई केली असल्याचा दावा मुंबई महापालिका व मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मंगळवारी केला. त्याला २४ तास उलटण्यापूर्वीच मुंबईत मुसळधार पाऊस पडल्याने अनेक सखल भागात वीतभर ते हातभार पाणी साचल्याने या नालेसफाई कामांची पोलखोल झाली आहे.
काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप, पालिका विरोधी पक्षनेते रवी राजा आणि भाजपचे नेते आशिष शेलार यांनी तीन दिवसांपूर्वीच नालेसफाईच्या कामाची पाहणी करून नालेसफाई कामांबाबत पालिकेने केलेला दावा खोटा असल्याचे सांगत मुसळधार पावसात मुंबईची तुंबई होण्याची शक्यता वर्तवली होती. त्याप्रमाणे आज अनेक सखल भागात पाणी साचल्याचे निदर्शनास आले.

मुंबईतील पावसाचे प्रमाण

मुंबईत पहाटेपासून मुसळधार पाऊस पडत आहे. शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरात चांगलाच पाऊस पडला आहे.
बुधवारी सकाळी ९ ते १० या कालावधीत पालिकेने खालीलप्रमाणे पावसाची नोंद केली आहे.

शहर भागात -: रावली कॅम्प – ५३ मिमी,  एफ/ उत्तर ४३ मिमी, दादर – ४१ मिमी, धारावी – ३९ मिमी, भायखळा – २५ मिमी, ब्रिटानिया पंपिंग स्टेशन – २४ मिमी,

पूर्व उपनगर -: विक्रोळी – ६० मिमी, चेंबूर – ३८ मिमी, कुर्ला – ३७ मिमी

पश्चिम उपनगर – मरोळ – ४९ मिमी, वांद्रे – ४८ मिमी, सांताक्रूझ ४३ मिमी, मालवणी – २३ मिमी इतक्या पावसाची नोंद पालिकेच्या पर्जन्य जलमापक यंत्रावर नोंदविण्यात आली आहे.

२६ जुलै २००५ च्या पूरस्थितीची आठवण

मुंबईत चार दिवस अतिवृष्टी होणार असल्याचा पूर्वइशारा हवामान खात्याने दिला होता. त्यानुसार मुंबईत आज पहाटेपासूनच मुसळधार पाऊस पडायला सुरुवात झाली. आज सकाळी ११.४३ वाजता समुद्रभरतीला सुरुवात झाली.समुद्रात ४.१६ मिटर उंचीच्या लाटा उसळत होत्या. तर सायंकाळी ५.३६ वाजता ओहोटीला लागणार आहे. अतिवृष्टीच्या काळात जर समुद्रात मोठी भरती असेल आणि समुद्रात ४.५० मिटर उंचीच्या लाटा उसळणार असतील त्यावेळी बशीसारखा खोलगट आकार असलेल्या मुंबई शहरात सखल भागात पाणी साचते.

शहरात पडणार्या पावसाचे साचलेले पाणी आणि सांडपाणी ज्यावेळी समुद्राला भरती नसते त्यावेळी समुद्रात ज्या ठिकणी सोडले जाते तेथील फ्लडगेट बंद करण्यात येतात. ज्यामुळे शहरातून समुद्रात सोडण्यात येणारे पाणी समुद्री लाटांच्या जोरामुळे फ्लड गेट मार्गे शहरात उलट्या दिशेने शिरून भयाण पुरस्थिती निर्माण होऊ नये. म्हणून हे फ्लडगेट बंद करण्यात येतात. अन्यथा पावसाचे पाणी आणि समुद्राचे शिरणारे पाणी यामुळे मुंबईची तुंबई होण्यास वेळ लागणार नाही.समुद्राला मोठी भरती नसल्याने मुंबईत पूरस्थिती निर्माण झाली नाही.

२६ जुलै २००५ रोजी मुंबईत अतिवृष्टी झाली होती. एकाच दिवसात ९४४” मिमी पावसाची नोंद झाली होती. त्याचवेळी समुद्राला मोठी भरती होती व साडेचार मीटर उंचीच्या लाटा उसळत होत्या. फ्लड गेट बंद केल्याने शहरातील पाणी समुद्रात जात नव्हते. तसेच, अतिवृष्टी झाल्याने मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने आणि मिठी नदीसह इतर नद्यांना पूर आल्याने आणि नाले तुंबल्याने मुंबईत पूरस्थिती निर्माण होऊन मोठी जीवित व वित्तीय हानी झाली होती. आजच्या पावसाने या आठवणी ताज्या झाल्या आणि मुंबईकरांच्या छातीत धडकी भरली.

 

First Published on: June 9, 2021 2:39 PM
Exit mobile version