झाड दुर्घटना प्रकरण: केवळ एकाच मृताच्या नातेवाईकांना मिळणार आर्थिक मदत

झाड दुर्घटना प्रकरण: केवळ एकाच मृताच्या नातेवाईकांना मिळणार आर्थिक मदत

झाड पडून मृत्यूमुखी पडलेले तीन नागरिक

शुक्रवारी झाडांच्या पडझडीमुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये तीन जणांचे बळी गेल्याने मुंबईत हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत पावलेले तिघेही ३५ ते ५० वयोगटातील असून तिघांनाही लहान मुले असल्याने त्यांच्या कुटुंबावरच आभाळ कोसळले. मात्र, या तिन्ही घटनांपैकी दोन घटना या खासगी सोसायटीच्या जागेतील असल्याने त्यांच्या नातेवाईकांना महापालिकेच्यावतीने कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत केली जाणार नाही. केवळ मालाडमधील दुर्घटनेतील शैलैश राठोड यांच्या कुटुंबालाच महापालिकेच्यावतीने एक लाखांची आर्थिक मदत मिळण्याची शक्यता आहे.

मुंबईत पावसाळ्यापूर्वीच वादळी वार्‍याने झाडे उन्मळून पडत तसेच झाडांच्या फांदया पडून शुक्रवारी मालाड पश्चिम येथे शैलेश राठोड (३८), जोगेश्वरी पूर्व येथील तक्षशिला सोसायटीत अनिल घोसाळकर (३८) आणि गोवंडीतील नितीन शिवलकर या तिघांचा मृत्यू झाला आहे. जोगेश्वरी आणि अणुशक्तीनगरमधील बीएआरसीच्या दोन्ही जागा खासगी सोसायटीतील असल्याने त्यातील दुर्घटनाग्रस्तांना महापालिकेच्या मार्गदर्शक धोरणानुसार मदत करता येणार नाही. या जोगेश्वरीतील तक्षशिला सोसायटी आणि अणुशक्तीनगर मधील बीएआरसीच्या उद्यान विभागाला महापालिकेच्यावतीने पत्र पाठवून आपल्या परिसरातील झाडे धोकदायक असल्याने ती कापून घ्यावीत, असे सूचित करण्यात आले होते. मात्र, ही नोटीस नसल्यामुळे महापालिकेच्यावतीने काणेत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात येत नसून पोलिसांच्यावतीने होणार्‍या कारवाईकडे महापालिकेचे लक्ष असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकार्‍यांनी दिली आहे.

तर मालाडमध्ये शैलेश राठोड हे वडिलांसह मंदिरामध्ये जात असताना ही घटना घडली. रस्त्यांच्या लगत असलेल्या मोकळ्या भूखंडावरील हे झाड कोसळले आहे. परंतु ही जाग रस्ते रुंदीकरणात येत असून ती जागा महापालिकेच्या ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु असल्याने राठोड कुटुंबाला महापालिकेच्यावतीने नियमानुसार जी आर्थिक मदत करता येईल, ती दिली जाईल, असे महापालिकेच्या अधिकार्‍यांनी स्पष्ट केले. मात्र, राठोड यांना लहान मुले असल्यामुळे माणुसकीच्या द्ष्टीकोनातून लोकप्रतिनिधींच्यावतीने आर्थिक मदत देण्याचाही प्रयत्न सुरु असल्याचे अधिकार्‍यांकडून सांगण्यात येत आहे. रस्त्यांवरील सार्वजनिक जागेत झाड पडून दुर्घटना झाल्यास मृतांच्या नातेवाईकांना १ लाख रुपये देण्याची तरतूद आहे. त्यामुळे केवळ मालाड दुर्घटनेतील मृताच्या नातेवाईकालाच महापालिकेची आर्थिक मदत दिली जाणार आहे. दरम्यान दुर्घटनेतील तिघांवरही शुक्रवारी आणि शनिवारी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

फांदया छाटणीसाठी सोसायट्यांनी महापालिकेकडे अर्ज करावा

जोगेश्वरी आणि अणुशक्ती नगर येथील दोन्ही दुर्घटनांमध्ये संबंधित सोसायटींना झाडे कापून घेण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्याप्रमाणे त्यांनी झाडांच्या फांदया छाटून घ्यायला हव्या होत्या. परंतु महापालिकेच्या पत्राची सोसायट्यांनी गंभीरपणे दखल घेतली नसल्याचे वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले. परंतु या दुर्घटनेनंतर ज्या सोसायट्यांना महापालिकेने पत्र पाठवली आहेत, त्यांनी महापालिकेकडे अर्ज करावे, जेणेकरून त्यांना छाटणीसाठी परवानगी दिली जाईल,असे अधिकार्‍यांनी आवाहन केले.

मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मागणी बासनात

झाडांमुळे होणार्‍या दुर्घटनांमध्ये मृत्यू पावणार्‍यांच्या नातेवाईकांना सध्या देण्यात येणार्‍या १ लाख रुपयांच्या आर्थिक मदतीच्या तुलनेत ही रक्कम ५ लाख करण्याचा ठराव महापालिका सभागृहात करण्यात आला. भाजप नगरसेवक प्रकाश गंगाधरे आणि शिवसेना नगरसेविका समृध्दी काते यांनी मांडलेल्या ठरावाच्या सूचना एकत्र करत सभागृहाने ठराव मंजूर केला. परंतु दीड वर्ष उलटत आले तरी या ठरावावर प्रशासनाच्यावतीने सकारात्मक निर्णय घेतला जात नसल्याने गंगाधरे व काते यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

खासगी सोसायट्यांच्या हद्दीतील झाडे तोडण्यास नकार

महापालिकेच्यावतीने रस्त्यालगत असलेल्या सार्वजनिक जागेतील मृत झाडे तसेच धोकादायक फांदयांची छाटणी महापालिकेच्यावतीने केली जाते. त्यामुळे खासगी सोसायट्यांच्या हद्दीतील धोकादायक झाडेही महापालिकेच्यावतीने तोडली जावी,अशी मागणी तत्कालिन भाजपच्या नगरसेविका शैलजा गिरकर यांनी केली होती. यासाठी महापालिकेच्यावतीने शुल्क आकारावे अशीही सूचना केली होती. परंतु आज महापालिका आपल्या परवानगीशिवाय खासगी सोसायट्यांनी झाडांच्या फांद्यांची छाटणी करु नये,असे फर्मान सोडत आहे. त्यामुळे खासगी सोसायट्यांकडून अजुनही फांदयांची छाटणी प्रभावीपणे व गंभीरतेने केली जात नाही.

First Published on: June 15, 2019 9:57 PM
Exit mobile version