आता ऑनलाईन पाहता येणार उत्तरपत्रिका – मुंबई विद्यापीठ

आता ऑनलाईन पाहता येणार उत्तरपत्रिका – मुंबई विद्यापीठ

mumbai university

मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाइन मूल्यांकनाच्या गोंधळाने हैराण झालेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाने मोठा दिलासा देणारा निर्णय मंगळवारी जाहीर केला आहे. या निर्णयानुसार येत्या परीक्षेपासून विद्यार्थ्यांना नव्या उत्तरपत्रिका देण्यात येणार असून मूल्यांकन पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तरपत्रिका वेबपोर्टलवर त्यांच्या लॉग-इनमध्ये पाहता येणार असल्याची घोषणा मंगळवारी विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी केली. विशेष म्हणजे, उन्हाळी सत्र परीक्षांचे सर्व निकाल परीक्षा झाल्यापासू ४५ दिवसांच्या आत जाहीर करण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून निकाल गोंधळामुळे त्रस्त झालेल्या विद्यार्थ्यांना थोडा का होईना, दिलासा मिळाला आहे.

मुंबई विद्यापीठाच्या निकाल कामांची माहिती देण्यासाठी मंगळवारी विद्यापीठात विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना कुलगुरु डॉ. सुहास पेडणेकर यांनी वरील घोषणा केली. यावेळी मुंबई विद्यापीठाच्या निकाल कामांचा आढावा देणारे एक सादरीकरण परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अर्जुन घाटुळे यांनी केले. यावेळी नवनियुक्त प्रकुलगुरु डॉ. रविंद्र कुलकर्णी आणि प्रभारी कुलसचिव डॉ. दिनेश कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

यावेळी झालेल्या महत्त्वपूर्ण घोषणा

 

ऑनलाइन मूल्यांकनाची पद्धत पारदर्शी

ऑनलाइन मूल्यांकनामुळे गेल्या वर्षी जो गोंधळ झाला, तो पुन्हा होऊ नये म्हणून विद्यापीठाचे सर्व प्रयत्न सुरु आहेत. ही पद्धत पारदर्शी असल्याचा विश्वास कुलगुरु डॉ. सुहास पेडणेकर यांनी यावेळी व्यक्त केला. तर पुढच्या वेळी निकाल गोंधळ होणार नाही, असे प्रतिपादन ही पेडणेकरांनी यावेळी केले.

प्राध्यापकांना कॉलेजात करता येणार तपासणी?

दरम्यान, ऑनलाइन मूल्यांकन करताना कॅप सेंटरमध्ये जाऊनच मूल्यांकन करावे लागत असल्याने या पद्धतीला प्राध्यापकांकडून विरोधाचा झेंडा दर्शवण्यात आला होता. यावर पर्याय काढताना येत्या काळात प्राध्यापकांना कॉलेजमधून किंवा त्यांच्या लॅपटॉपवरून पेपर तपासणी करता येईल का? यावर विचार सुरु असल्याची माहिती यावेळी डॉ. पेडणेकर यांनी दिली. यासाठी कोणकोणत्या सुरक्षा राबवता येतील, यासाठीचे प्रयत्न सुरु असून येत्या काळात याबाबतही लवकरच निर्णय जाहीर करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

विद्यार्थ्यांची माहिती उत्तर पत्रिकांवर छापूनच येणार!

दरम्यान, बबलिंगच्या समस्येवर तोडगा काढताना विद्यापीठाने आगामी परीक्षेसाठी नवीन उत्तरपत्रिका छापल्या असून या उत्तरपत्रिका वापरात आणल्या जाणार आहे. यात विद्यार्थ्यांची सर्व माहिती छापूनच येणार असून त्यात त्यांचे बैठक क्रमांक, कॉलेज कोड, विषायाचे कोड यासारख्या आवश्यक त्या सर्व माहितीचा समावेश असणार आहे.

निकालाची आकडेवारी

शाखा      एकूण उत्तरपत्रिका      तपासलेल्या उत्तर पत्रिका        तपासणी बाकी  

आर्टस        2,22,633               1,95,953                    26,680

कॉमर्स        8,34,244               7,22,061                 1,12,183

लॉ            22,300                      6,613                      5,687

मॅनेजमेंट     1,16,935                1,16,355                        580

सायन्स       1,92,752                1,62,809                    29,943

तंत्रज्ञान       2,73,903                2,72,588                      1,315

एकूण       16,62,767              14,76,379                 1,86,388

First Published on: July 17, 2018 9:09 PM
Exit mobile version