विद्यापीठ अ‍ॅपला 0.13 टक्के प्रतिसाद

विद्यापीठ अ‍ॅपला 0.13 टक्के प्रतिसाद

मुंबई विद्यापीठ

मुंबई विद्यापीठ परीक्षेचा निकाल गोंधळ किंवा वेळापत्रकाचा घोळ असो, या अनागोंदी कारभाराचा फटका सर्वप्रथम विद्यार्थ्यांना बसत असतो. अनेकवेळा असमन्वयामुळे अनेक विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होते. या सर्वांवर उपाय म्हणून मुंबई विद्यापीठ प्रशासनाने नुकतेच विद्यार्थी केंद्रित mum-e-suvidha हे मोबाईल अ‍ॅप सुरू केले. पण विद्यापीठाच्या या अ‍ॅपकडे विद्यार्थ्यांनी दुर्लक्ष केले असल्याचे समोर आले आहे. सात लाखांहून अधिक विद्यार्थी असलेल्या मुंबई विद्यापीठातील अवघ्या एक हजार विद्यार्थ्यांनीच हा अ‍ॅप डाऊनलोड केला आहे. विद्यापीठाच्या एकूण विद्यार्थी संख्येच्या ही संख्या अवघी ०.१३ टक्के इतकी असल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबई विद्यापीठाने विद्यार्थी आणि कॉलेजच्या दृष्टीकोनातून उपयुक्त ठरेल, यासाठी नुकतीच एका अ‍ॅपची घोषणा केली. सदर मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून विद्यार्थांना प्रवेशापासून ते परीक्षेच्या प्रवेशपत्रापर्यंतच्या सर्व सुविधा उपलब्ध होणार आहेत. mum-e-suvidha असे या मोबाईल अ‍ॅपचे नाव आहे. एमकेसीएलच्या मदतीने हा अ‍ॅप सुरू केला आहे. गुगल प्लेवरुन हा अ‍ॅप डाऊनलोड करुन वापरता येईल. दरम्यान, विद्यापीठाच्या सर्व माहिती आणि सूचना या अ‍ॅपच्या माध्यमातून एका क्लिकवर मिळणार आहेत. मात्र त्यानंतरही या अ‍ॅपकडे विद्यार्थ्यांनी दुर्लक्ष केल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई विद्यापीठात यंदाच्या शैक्षणिक वर्षांत सुमारे साडे सात लाख विद्यार्थी आहेत. तर ७८० हून अधिक कॉलेज आहेत. मात्र त्यानंतरही हा अ‍ॅप डाऊनलोड करण्यात विद्यार्थी उत्साही नसल्याचे समोर आले आहे. हा अ‍ॅप जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी डाऊनलोड करावा यासाठी विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या पीआरएन क्रमांकासाठी देण्यात आलेल्या मोबाईल क्रमांकावर या अ‍ॅपची लिंक आणि इतर आवश्यक ती माहितीदेखील पाठविली आहे. मात्र त्यानंतरही विद्यार्थ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे उघड झाले आहे.

काय आहे mum-e-suvidhaया अ‍ॅपच्या माध्यमातून विद्यार्थांना विद्यापीठाने दिलेला पीआरएन हा १६ अंकी क्रमांक त्याचा युजर आयडी असेल व पासवर्ड कॉलेजच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिलेला आहे. जर पासवर्ड विसरला असेल तर विद्यापीठाच्या डिजीटल युनिव्हर्सिटीच्या संकेतस्थळावरून फरगॉट पासवर्डच्या माध्यमातून त्याला पासवर्ड मिळविता येईल. या मोबाईल अ‍ॅपमधून महाविद्यालय, विद्यार्थ्यास प्रवेश आणि परीक्षासंदर्भात विविध सुविधा उपलब्ध होतील. विद्यार्थ्यास परीक्षेच्या तारखा, परीक्षेचे वेळापत्रक, हॉलतिकीट अशा सुविधा मिळतील. तसेच महाविद्यालयांना विद्यार्थ्यांना विविध सूचना या अ‍ॅपमार्फत पाठवता येतील. तसेच विद्यापीठालाही महाविद्यालयांना या अ‍ॅपमार्फत विविध सूचना देता येऊ शकतात. तसेच महाविद्यालयास या अ‍ॅपमधून प्रवेश व परीक्षासंबंधीची सर्व माहिती मिळते. परिणामी विद्यापीठ, महाविद्यालय तसेच विद्यार्थ्यांमध्ये समन्वय राखण्यास मदत होणार आहे.

म्हणून मिळतोय कमी प्रतिसादमुंबई विद्यापीठाने सुरू केलेल्या या अ‍ॅपबद्दल बर्‍याच विद्यार्थ्यांना माहिती नसल्याची माहिती विद्यार्थ्यांकडून देण्यात आली आहे. तर अनेक विद्यार्थ्यांना विद्यापीठाने पाठवलेली लिंकच न मिळाल्याने डाऊनलोड करायचा कसा, असा प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित करण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांना अ‍ॅपची माहितीच नाही
मुंबई विद्यापीठाने नुकतेच हे अ‍ॅप सुरू केले आहे. विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेल्या नंबरवर विद्यापीठाकडून मेसेज पाठवून या अ‍ॅपची माहिती देण्यात आली आहे. लवकरच विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वाढेल. यासाठी विद्यापीठाकडून आवश्यक ती सर्व पावले उचलण्यात येतील. विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा यासंदर्भातील मेसेज पाठविण्यात येतील.
– डॉ. लीलाधर बनसोड, जनसंपर्क अधिकारी, मुंबई विद्यापीठ.

First Published on: September 10, 2018 6:00 AM
Exit mobile version