मुंबई विद्यापीठात मनविसेचे आंदोलन

मुंबई विद्यापीठात मनविसेचे आंदोलन

मुंबई विद्यापीठ

मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिव पदी नियुक्त केलेले डॉ. अजय देशमुख यांची निवड रद्द करावी, जय हिंद कॉलेजला मिळालेला उत्कृष्ट कॉलेजचा पुरस्कार रद्द करावा, सिद्धार्थ विधी कॉलेजचे प्राचार्य डॉ. रेड्डी यांची हकालपट्टी करावी, मिठीबाई कॉलेजमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीचा अहवाल सादर करा, अशा विविध मागण्यांसाठी बुधवारी मनविसेच्या शिष्टमंडळाने मुंबई विद्यापीठात आंदोलन केले. मनविसेच्या आंदोलनाची दखल घेत कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापकीय समितीची बुधवारी कुलगुरूंच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी मनविसेच्या शिष्टमंडळाने मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिव पदी नियुक्त केलेले डॉ. अजय देशमुख यांच्यावर अनेक भ्रष्टाचार व गैरप्रकाराचे आरोप असल्याने त्यांच्या नियुक्तीला विरोध दर्शवत त्यांची निवड रद्द करावी, अशी जोरदार मागणी केली. त्याचप्रमाणे वायफायसाठी विद्यार्थ्यांकडून हजारो रुपये शुल्क उकळले असताना जयहिंद कॉलेजला उत्कृष्ट कॉलेजचा पुरस्कार कोणत्या निकषांवर देण्यात आला, असा प्रश्न मनविसेकडून उपस्थित करण्यात आला, तसेच विलेपार्ले येथील मिठीबाई कॉलेजमधील कार्यक्रमावेळी झालेल्या चेंगराचेंगरीची चौकशी करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीकडून अहवाल सादर करण्यास विलंब का होत आहे, तसेच सिद्धार्थ लॉ कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉ. के.सुधाकर रेड्डी यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक उद्दिष्टांना हरताळ फासण्यात येत आहे, तसेच आंबेडकरांनी स्थापन केलेल्या विद्यापीठामध्ये त्यांचीच जयंती करण्यास विरोध करणार्‍या रेड्डींवर कारवाई करण्यास विद्यापीठाकडून विलंब का होत आहे, असे अनेक प्रश्न यावेळी मनविसेकडून व्यवस्थापन समितीच्या बैठकीसमोर उपस्थित करण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या शिष्टमंडळात मुंबई विद्यापीठ अध्यक्ष अ‍ॅड. संतोष धोत्रे, राज्य उपाध्यक्ष संतोष गांगुर्डे, परशुराम तपासे, विभाग अध्यक्ष अमोल रोगे, विद्यापीठ उपाध्यक्ष अभिजित भोसले यांचा समावेश होता.

मनविसेची दुहेरी भूमिका
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून कुलसचिव डॉ. अजय देशमुख यांच्या नियुक्तीला विरोध करण्यात येत आहे. मात्र, तरी काही दिवसांपूर्वी मनविसेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांनी मुंबई विद्यापीठात जाऊन त्यांचे स्वागत केले होते. ही भेट योगायोग असल्याचे मनविसेकडून सांगण्यात येत असले तरी कुलसचिवांबाबत मनसेच्या अशा दुहेरी भूमिकेबाबत विद्यापीठात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

First Published on: February 8, 2019 4:39 AM
Exit mobile version