mumbai vaccination scam : मुंबईत 2 हजार 53 नागरिकांना दिली बोगस लस

mumbai vaccination scam : मुंबईत 2 हजार 53 नागरिकांना दिली बोगस लस

अंधेरीतील बोगस लसीकरण प्रकरणाचा पर्दाफाश, एकाला अटक

मुंबईतील बोगस लसीकरण मोहिमेची आता मुंबई उच्च न्यायालयाने गांभिर्याने दखल घेतली असून पालिकेला चांगलेच ठणकावले आहे. यात कांदिवलीतील बोगस लसीकरण मोहिम उजेडात येताच मुंबईतील इतर भागांतीलही बनावट लसीकरण मोहिम समोर आल्या आहेत. याप्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. या सुनावणीदरम्यान मुंबईतील बोगस लसीकरणासंदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

बोगस लसीकरण मोहिमेप्रकरणी मुंबईतील चार वेगवेगळ्या ठिकाणांवर घेण्यात आलेल्या लसीकरण शिबीरांविरोधात चार एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. अशी माहिती मुख्य सरकारी वकील दीपक ठाकरे यांनी आज मुंबई उच्च न्यायालयात दिली. तसेच या बोगस लसीकरणाच्या माध्यमातून मुंबईतील जवळपास २ हजार ५३ नागरिकांना बनावट लस देत फसवणुक करण्यात आली. अशी धक्कादायक माहिती सरकारी वकील ठाकरे यांनी आज हायकोर्टात दिली.

मुंबईतील कांदिवली, वर्सोवा, खार, बोरिवली अशा चार वेगवेगळ्या ठिकाणी बनावट लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. एकाच टीममधील या बोगस लोकांनी मुंबईतील इतर ९ वेगवेगळ्या ठिकाणीही लसीकरण मोहिमेचे आयोजन केले होते. त्यानुसार मुंबई महानगरपालिकेने २३ जून रोजी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली. अशी माहिती वकील अनिल साखरे यांनी कोर्टात दिली आहे.

बोगस लसीकरणाच्या एका शिबिराचे आयोजन बोरिवलीतील आदित्य कॉलेजमध्ये करण्यात आले होते. याप्रकरणी या कॉलेजचे आशिष मिश्रा यांनाही एफआयआरमध्ये गुन्हेगार ठरवण्यात आले आहे. तर मनिष त्रिपाठी हा आरोपी फरार झाला आहे. याप्रकरणी आत्तापर्यंत ४०० साक्षीदारांचे जबाब पोलिसांनी नोंदवले आहेत.

बनावट लसीकरण मोहिम सुरु असल्यास या क्रमांकावर तक्रार करा

मुंबईत सुरू असलेल्या बोगस लसीकरणी आता मुंबई पोलिस अॅक्शन मोडमध्ये आले आहे. मुंबई पोलिसांनी कुठेही अशाप्रकारचे लसीकरण सुरू असल्याचा संशय आल्यास तत्काळ कळविण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. नागरिकांनी याबाबतची माहिती देण्यासाठी २२६२५०२०, २२६२७९८३, २२६२३०५४ किंवा १०० क्रमांक तसेच स्थानिक पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.


 

First Published on: June 24, 2021 2:38 PM
Exit mobile version