Good News : मुंबईत आज एकही कोरोनाबाधित नाही

Good News : मुंबईत आज एकही कोरोनाबाधित नाही

मुंबईः मुंबईत आज एकाही नवीन कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झालेली नाही. याआधी १६ मार्च २०२० रोजी शून्य बाधिताची नोंद होती. तब्बल ३४ महिन्यांनी मुंबईत शून्य बाधिताची नोंद झाली आहे.

महाराष्ट्रात काही ठिकाणी कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. कल्याण-डोंबिवली, पनवेल, पिंपरी चिंचवड, पुणे, नाशिक, जालना आणि वाशिम येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून कोरोना हद्दपार होण्याचे संकेत आहेत.

डिसेंबर २०१९ मध्ये चीनमध्ये कोरोनाचा संसर्ग सुरु झाला. काही दिवसांतच कोरोनाचा विळखा संपूर्ण जगाला बसला. भारतातही याचा शिरकाव झाला. मुंबई विमानतळावरुन पुणे येथे गेलेला नागरिक हा महाराष्ट्रातील पहिला कोरोना रुग्ण होता. त्यानंतर हळूहळू कोरोनाचा फैलाव मुंबईसह राज्यात सुरु झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्च २०२० मध्ये एक दिवसाचा लॉकडाऊन केला. त्यानंतर काही दिवसांत संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आला. सर्व व्यवहार ठप्प झाले. वर्क फ्रॉम होमची संकल्पना सुरु झाली. त्याचवेळी रुग्णसंख्या झपाट्याने वाढत होती.

धारावी व वरळी येथील कोरोनाबाधितांची संख्या चिंता वाढवणारी होती. मात्र महापालिकेने नियोजनबद्ध आखणी करुन बाधितांची संख्या नियंत्रणात आणली. आरोग्य व्यवस्थेवर ताण आल्याने आरोग्य विभागात तातडीने भरती करण्यात आली. आर्थिक दुर्बलांना मोफत अन्नधान्य देण्याची योजना केंद्र सरकारने सुरू केली.

दोन महिन्यांच्या लॉकडाऊननंतर जून २०२० मध्ये पहिल्या आठवड्यात कोरोनाचे नियम शिथिल करण्यात आले. जनजीवन हळूहळू पूर्वपदावर आले. मात्र काही दिवसांतच कोरोनाची दुसरी लाट आली. या लाटेतही दिवसागणिक बाधितांची संख्या झपाट्याने वाढली. दुसऱ्या लाटेत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या सर्वांनाच धक्का देणारी होती. मात्र दुसऱ्या लाटेतही पालिकेने परिस्थिती आटोक्यात आणली. पालिकेच्या कामाचे देश व आंतरराष्ट्रीय पातळीवर कौतुक झाले. त्यानंतर राबविण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेमुळे कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली. भारतातील बहुतांश राज्यातून कोरोना हद्दपार झाला. काही दिवसांपूर्वी चीनमध्ये कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढला. मात्र भारतातील रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्यात प्रशासनाला यश आले आहे.

First Published on: January 24, 2023 10:37 PM
Exit mobile version