नको कोट्यवधींची व्हुईंग गॅलरी, त्यापेक्षा आहे ती चौपाटी सुधारा…

दादर चौपाटीत भराव टाकून उभारण्यात येणारी हीच ती व्हुईंग गॅलरी

मुंबईत देशी विदेशी पर्यटकांना आकृष्ट करण्यासाठी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दादर चौपाटी आणि गिरगाव चौपाटी येथे व्हुईंग पॉईंटची खर्चिक योजना आखली आहे .त्यासाठी समुद्रात मोठ्या प्रमाणावर भरणी घालण्यात येत असून मोठमोठे दगडही टाकले जात आहेत. आधीच प्रत्येक वर्षी पावसाळ्यात मुंबईची तुंबई होत आहे. यामुळे मुंबईतील पावसाळी पाण्याचा निचरा होण्याचा मोठा प्रश्न निर्माण झालेला असताना समुद्रात भरणी टाकली जात असल्याने पर्यावरणाचा समतोल बिघडत असल्याचे चित्र आहे.

तर दुसरीकडे कोस्टल रोडच्या कामामुळे मुंबईची शान असलेल्या हाजी अली वरळी सी फेसची वाट लागली आहे. समुद्रात सुरू असलेल्या मानवी अतिक्रमणामुळे समुद्राचे पाणी शहरात घुसण्यास सुरवात झाली आहे. मागील पावसाळ्यापासून दक्षिण मुंबई शहर भागात पावसाचे पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. इतक्या वर्षात कधी नव्हे ते मंत्रालयाच्या बाहेर पावसाळ्यात पाणी तुंबले होते त्यामुळे व्हुईंग पॉइंटसारख्या या प्रकल्पांवर कोट्यवधी रुपये खर्च करून समुद्रात भरणी घालण्यापेक्षा आहे त्याच चौपटीचे सुशोभीकरण करणे योग्य असल्याचे मत मुंबईकर व्यक्त करत आहेत. त्याचबरोबर प्रकल्पांवर खर्च करण्यात येणारा पालिकेचा कोट्यवधी रुपयांचा निधीही यामुळे वाचेल आणि पर्यावरणाची हानी टळेल अशी प्रतिक्रीया पर्यावरण प्रेमी व्यक्त करत आहेत.

याचे सर्वात चांगले उदाहरण म्हणजे दादरच्या किर्ती कॉलेज चौपाटीपासून प्रभादेवीच्या बॉम्बे डाईंग बंगल्यापर्यंत चौपाटीवर पाहायला मिळेल. मुंबईत शिल्लक राहिलेली वाळुची पुळण असलेली ही एकमेव या चौपाटीवर आहे. या चौपाटीवरून सूर्यास्ताचे अतिशय विहंगम दृश्य दिसते.

संध्याकाळी व्हुईंग गॅलरीमधून पाहायला मिळणार आहे तेच दृश्य किंबहुना त्यांच्यापेक्षा अधिक चांगले दृश्य कीर्ती कॉलेजच्या चौपाटीवर वाळूत बसून पाहायला पर्यटकांना मिळेल. कुटुंबासोबत आलेल्या लहानग्यांना वाळूत छानसे किल्लेही करता येतील. पण सध्या या चौपाटीची अतिशय दुरवस्था झाली आहे. बेस्टच्यावतीने या चौपाटीवर खांब लावून चौपाटीवर प्रखरे दिवे लावण्याची योजना आखली आहे. पण या कामामुळे आणि पालिकेच्या दुर्लक्षामुळे या चौपाटीची सध्या अतिशय दुरवस्था झाली आहे. ठिक ठिकाणी खड्डे पडले आहेत. ही चौपाटी जर चांगली केली तर व्हुईंग पॉईंटचा अतिशय सुंदर नजारा या ठिकाणी पाहता येईल. गेल्या अनेक वर्षापासून या चौपाटीवर सुंदर वाळूची पुळण शंख-शिंपले आहेत. पण गेल्या काही दिवसांपासून अचानक मोठे मोठे बॉर्डर दगडविटा लोखंडी शिगा पाईप त्यामुळे चौपाटी भकास झाली आहे. चौपाटीवरील वाळूमध्ये घाणीचे साम्राज्य आहे.

या चौपाटीवर बसून अत्यंत सुंदर समुद्रकिनारा आणि सूर्यास्ताचे छान दृश्य दिसते समोर सी लिंक आहे . भरतीच्या लाटा पाहायला मिळतात. पण पूर्वी या चौपाटीवर बसून भावी संसाराची स्वप्ने अनेक जोडप्यांनी पहिली आहेत. पण आता कोणालाही फिरण्यासारखी किंवा कुटुंबाला घेऊन भेळपुरी खाण्यासारखी परिस्थिती या चौपाटीवर नाही. त्यामुळे मुंबईत सध्या शिल्लक असलेल्या चौपाट्यांचे सुशोभिकरण केले तर पालिकेचे कोट्यवधी रुपये वाचतील.

First Published on: October 18, 2021 2:29 PM
Exit mobile version