मुंबईत गणेश मंडपांना मिळणार “सुरक्षा ऑडिट”चे कवच

मुंबईत गणेश मंडपांना मिळणार “सुरक्षा ऑडिट”चे कवच

दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाला आता व्यापक स्वरूप आले असून गणरायाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न सुद्धा गंभीर होत चालला आहे. मुंबईतील अनेक प्रसिद्ध गणेश मंडळांच्या मंडपात एका वेळी दोन ते तीन हजार भाविक उपस्थित असतात. अशा वेळी आग लागल्याची घटना घडल्यास मोठा अनर्थ होऊ शकतो. याच पार्श्वभूमीवर गेली सात वर्षे “फायर अँड सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडिया” ही संस्था फायर अँड सेक्युरिटी ऑडिटच्या माध्यमातून गणेश मंडळांना सहकार्य करत आहे.

ही संस्था मंडपात येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी गणेश मंडळांना योग्य ते मार्गदर्शन करत आहेत आणि यासाठी त्यांना मुंबई पोलीस आणि मुंबई अग्निशमन दलाची सुद्धा मदत मिळत आहे.

फायर अँड सेक्युरिटी ऑडिटच्या माध्यमातून गणेश मंडळांना सहकार्य

या गोष्टींचं दिलं जातंय मार्गदर्शन 

योग्य स्पॉटला सीसीटीव्ही कॅमेरा लावणे, रोषणाई करताना केलेली वायरींगची तपासणी, आग विझवण्याच्या साधनांची तपासणी, आपत्कालीन वेळी बाहेर निघण्याची व्यवस्था , मेटल डिटेक्टर सुरक्षा यंत्रणा, आपत्कालीन परिस्थितीत उपाय करण्याचे मंडळातील कार्यकर्त्यांना मॉक ड्रील देणे अशा अनेक गोष्टींचं मार्गदर्शन केलं जातं आहे.

“उत्सवादरम्यान जर कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर सरकारी यंत्रणांची मदत पोहोचेपर्यंत बचाव कार्य कसे करायचे ? याबाबत कार्यकर्ते प्रशिक्षित असणे आवश्यक आहे. २००२ सालापासून संस्था फायर प्रोटेक्शन, लाइफ सेफ्टी, सिक्युरिटी, बिल्डींग ऑटोमेशन, लॉस प्रिवेंशन आणि रिस्क मॅनेजमेंट या क्षेत्रात सरकारी संस्थांसोबत काम करत आहे. मुंबईत दोन हजारांहुन अधिक गणेश मंडळे असून दरवर्षी गणेशाच्या दर्शनासाठी पर्यटक आणि भाविकांची गर्दी वाढतच आहे. यावर्षी जवळपास ३०० गणेश मंडळांचे सुरक्षा ऑडिट करायचा आमचा प्रयत्न असणार आहे. या ऑडिटमध्ये आर्किटेक्ट, इंजिनिअर तसेच आपत्ती व्यवस्थापनामधील काही लोक कार्यरत आहेत.- अश्विन ईजंतकर,अध्यक्ष,फायर अँड सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडिया मुंबई चॅप्टर.

First Published on: September 10, 2018 6:27 PM
Exit mobile version