पालिका शाळा आता फेसबुक पेजवर

पालिका शाळा आता फेसबुक पेजवर

मुंबई महानगरपालिकेच्या ढासळत असलेल्या शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी शिक्षण विभागाने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी काही दिवसांपूर्वीच पालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून शाळांच्या इमारतींचे कायापालट केल्यानंतर आता पालिका शाळांतील विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी सोशल नेटवर्किंग साईट्सची मदत घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यादृष्टीकोनातून पहिले पाऊल म्हणून प्रशासनाने फेसबुकवर पालिका शिक्षण विभागाचे विशेष पेज तयार केले असून या पेजवरून पालकांना आकर्षित करण्याचे काम केले जाणार आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या शाळांचा खालावत असलेल्या दर्जा लक्षात घेता त्याचे थेट परिणाम विद्यार्थी संख्येवर देखील बसले आहेत. त्यामुळे पालिका शाळेतील विद्यार्थी संख्या घटली असून त्याची गंभीर दखल पालिका प्रशासनाने घेतली आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वीच पालिका शाळांनी कोट्यवधी रुपये खर्च करून पालिका शाळांचा कायापालट करीत नुतनीकरण केले आहेत. त्यानंतर आता पालकांना पालिका शाळांकडे वळविण्यासाठी पालिकेने नवीन मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार सोशल नेटवर्किंग साईट्सची मदत घेण्याचा प्रस्ताव शिक्षण समिती सदस्य साईनाथ दुर्गे यांनी काही दिवसांपूर्वी ठेवला होता. यानुसार आता फेसबुक आणि इतर सोशल नेटवर्किंग साईट्सवर पालिका शाळांची माहितीचा प्रसार करण्यात येणार आहे. ज्यात पालिका शाळांमध्ये कोणकोणत्या सुविधा दिल्या जात आहेत, शाळांमध्ये येणार्‍या विद्यार्थ्यांची कशाप्रकारे काळजी घेण्यात येणार आहे, त्याचबरोबर पालिका शाळांमध्ये कशाप्रकारे शिक्षणाचे धडे दिले जाणार आहेत, याबाबत ही माहिती देण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.  दरम्यान, पालिका शाळांतील उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी याचा नक्की फायदा होणार आहे. आज विद्यार्थी असो किंवा पालक त्यांच्यामध्ये सोशल नेटवर्किंग साईट्सचा वापर करताना दिसत आहेत. त्यामुळे फेसबुकचा वापर नक्की उपयुक्त ठरणार आहे, असे मत याबद्दल बोलताना शिक्षण समितीचे सदस्य साईनाथ दुर्गे यांनी व्यक्त केले.

पालिका शाळांमध्ये दिले जाणारे शिक्षण हे उत्तम असल्याचे पालकांपर्यंत पोहचविणे गरजेचे आहे. आम्ही दिल्ली आणि इतर राज्यांच्या पॅर्टनचा अभ्यास करून झाल्यानंतर अनेक वेगळे प्रयोग करीत असून त्याच धर्तीवर या प्रयोगाची देखील अंमलबजावणी केली जात आहे.

– महेश पालकर, शिक्षणाधिकारी , मुंबई महानगर पालिका.

First Published on: September 9, 2018 4:00 AM
Exit mobile version