आता मुंब्रा रेल्वे स्थानकाच्या नामांतराचा वाद पेटणार!

आता मुंब्रा रेल्वे स्थानकाच्या नामांतराचा वाद पेटणार!

मध्य रेल्वेच्या मुंब्रा रेल्वे स्थानकाचे नाव मुंब्रादेवी रेल्वे स्थानक करण्याची मागणी भाजपचे ठाणे जिल्हा अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांनी शुक्रवारी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन केली आहे. विधानसभेत सनातन हिंदू धर्मावरून संतप्त भावना व्यक्त करणारे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अडचणीत आणण्यासाठीच भाजपने नामांतराची ही खेळी केल्याचे बोलले जात आहे.

भाजपचे ठाणे जिल्हा अध्यक्ष व आमदार निरंजन डावखरे यांनी शुक्रवारी रेल्वेसंदर्भातील विविध मागण्यांकरिता रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी मुंब्रा रेल्वे स्थानकाचे नामकरण मुंब्रादेवी रेल्वे स्थानक करण्यात यावे, अशी मागणी केली. स्थानिक भाजप पदाधिकार्‍यांच्या या मागणीवर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन रावसाहेब दानवे यांनी दिल्याचे आमदार निरंजन डावखरे यांनी सांगितले.

मुंब्रा रेल्वे स्थानकाचे नाव पूर्वीपासून मुंब्रा हेच आहे. मुंब्रादेवीवरून रेल्वे स्थानकाला मुंब्रा हे नाव पडल्याचे स्थानिक
जुनेजाणते रहिवासी सांगतात. आता भाजपच्या या नामकरणाच्या मागणीमुळे नवा वाद उभा राहणार आहे.

स्थानिक रहिवाशांची मागणी
मुंब्रा रेल्वे स्थानकाचे नामकरण मुंब्रादेवी रेल्वे स्थानक असे करण्याची स्थानिक रहिवाशांची पत्रे माझ्याकडे आली आहेत. स्थानिक नागरिकांच्या या मागणीची दखल घेऊनच मी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन नामकरणाची मागणी केली. ठाणे महापालिकेकडून अशा प्रकारच्या नामकरणाचा प्रस्ताव मंजूर होऊन तो राज्य सरकारकडे तसेच रेल्वे मंत्रालयाकडे पाठवावा लागतो. महापालिकेत सध्या प्रशासकीय राजवट आहे, तरीदेखील अशा प्रकारचा ठराव महापालिकेकडून राज्य सरकारकडे व रेल्वे मंत्रालयाकडे पाठवण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. – निरंजन डावखरे

धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न
मुंब्रा रेल्वे स्थानकाचे नाव मुंब्रादेवी वरूनच पडले आहे आणि ते सुरुवातीपासून मुंब्रा हेच आहे. धार्मिक तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न या नामकरणामागे आहेत, तथापि असे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत. – आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड

First Published on: March 4, 2023 5:45 AM
Exit mobile version