विना मास्क फिरणाऱ्यांकडून ठाण्यात ५८ हजारांचा दंड वसूल

विना मास्क फिरणाऱ्यांकडून ठाण्यात ५८ हजारांचा दंड वसूल

प्रातिनिधिक छायाचित्र

विना मास्क सार्वजनिक ठिकाणी फिरणार्‍या व्यक्तींविरोधात ठाणे महानगरपालिकेने सुरू केलेल्या मोहिमेमध्ये शनिवारी एकूण ११६ व्यक्तींविरूद्ध दंडात्मक कारवाई करून ५८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशान्वये ही कारवाई सुरू करण्यात आली आहे.

ठाणे महानगरपालिका हद्दीत गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी, शासकीय कार्यालये तसेच खासगी कार्यालये या ठिकाणी अनेक व्यक्ती विना मास्क संचार करतानाचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी शुक्रवारी त्याबाबतचा आदेश काढला होता.

आदेशाच्या पहिल्याच दिवशी महापालिका हद्दीमध्ये विना मास्क सार्वजनिक ठिकाणी फिरणार्‍या एकूण ११६ व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईअंतर्गत एकूण ५८ हजार एवढा दंड वसूल करण्यात आला. यामध्ये माजिवडा मानपाडा प्रभाग समितीमध्ये १४ हजार दंड वसूल करण्यात आला. वर्तकनगरमधून ५५०० तर लोकमान्यनगर सावरकर प्रभाग समितीमधून ४५०० दंड वसूल करण्यात आला. वागळे प्रभाग समितीमधून ३५००, नौपाडा कोपरी प्रभाग समितीअंतर्गत १६५०० तर कळवा प्रभाग समितीमधून ४००० एवढा दंड वसूल करण्यात आला.

मुंब्रा प्रभाग समितीमध्ये या कारवाईमध्ये एकूण ४००० एवढा दंड वसूल केला तर दिवा प्रभाग समितीमध्ये एकूण ६००० एवढा दंड वसूल करण्यात आला. दरम्यान दंडात्मक कारवाई करताना नागरिकांशी योग्य संवाद साधून त्यांच्यामध्ये मास्क वापरण्याचे महत्त्व समजून सांगावे, असे स्पष्ट करून महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सूचना दिल्या आहेत.

First Published on: September 13, 2020 6:54 AM
Exit mobile version