महापालिकेचा एमटीएनएलला हात

महापालिकेचा एमटीएनएलला हात

शाळांमध्ये इंटरनेटसह दूरध्वनी जोडणी

महानगर टेलिफोन निगम लिमिटेड डबघाईला आलेली असतानाच आता त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी महापालिकेने हातभार लावण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक अशा एकूण 714 शाळांमध्ये एमटीएनएलच्या दूरध्वनी सेवांसह इंटरनेट जोडणीही घेतली जाणार आहे. एका बाजूला एमटीएनएलच्या सेवांपासून जनता लांब जात असतानाच महापालिकेने यांची सेवा घेऊन त्यांना आर्थिक सक्षम बनवण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल 45 लाखांमध्ये ही सेवा उपलब्ध करून घेतली जात आहे.

मुंबई महापालिका शाळा व प्रशासकीय कार्यालयांमध्ये सुसंवाद होण्यासाठी महाालिकेच्या सर्व शाळांमध्ये इंटरनेटसह दूरध्वनीची सुविधा एमटीएनएलच्या माध्यमातून 2007मध्ये सुरू करण्यात आली आहे. तसेच 2015मध्ये महापालिकेच्या 406 शालेय इमारतींमध्ये संगणक उपलब्ध करून देऊन एमटीएनएलच्या यांच्याकडून कॉम्बो अनलिमिटेड 699 या योजनेंतर्गत टेलिफोन व ब्रॉडबॅण्ड इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे सध्या 1243 शाळांपैकी 315 शाळांमध्ये एमटीएनएलच्या माध्यमातून इंटरनेटसह दूरध्वनीची जोडणी उपलब्ध आहे. त्यामुळे आता 714 शाळांमध्ये इंटरनेटसह नव्याने जोडणी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. तसेच उर्वरित 214 व नवीन सुरू होणार्‍या शाळांनाही इंटरनेटसह दूरध्वनी जोडणीची सुविधा आवश्यक राहील, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

सध्या महापालिकेच्या 579 प्राथमिक व १३५ माध्यमिक अशा 714 शाळा व आवश्यकता असल्यास या शाळाव्यतिरिक्त इतर शाळांच्या मागणीनुसार इंटरनेटसह नवीन दूरध्वनी जोडणीसाठी एमटीएनएलची सेवा घेतली जाईल, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले. यासाठी 45 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.

First Published on: January 10, 2019 4:07 AM
Exit mobile version