द्रमुक पार्टीच्या जेष्ठ नेत्याची पत्नीसह हत्या करणाऱ्याला मुंबईत अटक

द्रमुक पार्टीच्या जेष्ठ नेत्याची पत्नीसह हत्या करणाऱ्याला मुंबईत अटक

प्रातिनिधिक फोटो

तामिळनाडू राज्यातील ‘द्रमुक’ (डीएमके) पार्टीच्या एका जेष्ठ नेत्याची त्याच्या पत्नीसह हत्या करणाऱ्या तेथील स्थनिक ‘ब्लॅक फॉरवर्ड’ या राजकीय पार्टीच्या कार्यकर्त्याला मुंबईतील शीव येथून अटक करण्यात आली आहे. ही कारवाई तामिळनाडू पोलिसांनी मुंबई पोलिसांच्या मदतीने केली आहे. जामिनावर बाहेर आल्यानंतर द्रमुक पार्टीचे कार्यकर्ते आपल्याला ठार मारतील या भीतीने अटक करण्यात आलेला ‘ब्लॅक फॉरवर्ड’ पार्टीचा कार्यकर्ता हा मुंबईत नाव बदलून लपून बसला होता. प्रकाश जगदीश पंडियन उर्फ अभिमन्यू देवरे (३१) असे अटक करण्यात आलेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे. मुंबईतील शीव परिसरात तो एका मित्राच्या घरी अभिमन्यू देवरे या नावाने राहत होता.

आरोपीवर दोन वेळा खुनी हल्ला

तामिळनाडू राज्यातील डीएमके आणि ब्लॅक फॉरवर्ड या राजकीय पार्टीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरु आहेत. १९८५ मध्ये ब्लॅक फॉरवर्ड या राजकीय पक्षाचे जेष्ठ नेते वेलातेवर यांची हत्या करण्यात आली होती. तेव्हापासून या दोन्ही पार्टीतील वाद विकोपाला गेले आणि वेलोतेवार यांच्या हत्येचा सूड घेण्यासाठी ब्लॅक फॉरवर्डच्या कार्यकर्त्यांनी २०१२ मध्ये तामिळनाडूमधील विरधुरनगर जिल्ह्यातील डीएमके ह्या राजकीय पार्टीचे जेष्ठ नेते एस.आर.नागराजन आणि त्यांच्या पत्नीची निर्घृण हत्या केली होती. या हत्याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी ब्लॅक फॉरवर्ड या पार्टीच्या ७ कार्यकर्त्याना अटक केली होती. प्रकाश जगदीश पंडियन हा दोन वर्षांपूर्वी जामिनावर बाहेर आला होता. जामिनावर बाहेर येताच डीएमके पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पांडियन याच्यावर दोन वेळा खुनी हल्ला केला होता. या हल्ल्यातून पांडियन हा थोडक्यात बचावला होता. मात्र डीएमके पार्टीचे कार्यकर्ते आपली हत्या करतील या भीतीने पांडियनने दोन वर्षापूर्वीच तामिळनाडू येथून पळ काढला आणि मुंबई गाठली होती.

नाव बदलून राहत होता

मुंबईतील शीव येथे एका ओळखीच्या मित्रांसोबत तो अभिमन्यू देवरे या नावाने राहू लागला होता. पांडियन मृत्यूच्या भीतीने तामिळनाडू येथील न्यायालयात तारखेला जाणे देखील सोडून दिले होते. पांडियन तारखेला गैरहजर राहत असल्यामुळे तेथील स्थानिक न्यायालयाने त्याचा विरोधात अटक वारंट जारी करुन त्याचा शोध घेण्याचा आदेश पोलिसांना दिला होता. स्थानिक पोलिसांनी पांडियनचा शोध सूर केला असता तो मुंबईत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तामिळनाडू पोलिसांनी मुंबई पोलिसांच्या मदतीने पांडियनचा शोध घेतला असता पांडियन हा मुंबईतील शीव येथे एका मित्राच्या घरी नाव बदलून राहत असल्याची माहिती पोलिसाना मिळाली. या माहितीच्या आधारे तामिळनाडू पोलिसांनी मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाच्या मदतीने पांडियन उर्फ अभिमन्यू देवरे याला मित्राच्या घरातून बेड्या ठोकल्या.

 

 

 

First Published on: March 24, 2019 9:35 PM
Exit mobile version