महिलेच्या हत्येचे गूढ उकलले! सीसीटीव्हीमुळे पटली मृतदेहाची ओळख

महिलेच्या हत्येचे गूढ उकलले! सीसीटीव्हीमुळे पटली मृतदेहाची ओळख

महिलेचा मृतदेह (प्रातिनिधिक चित्र)

११ मे रोजी गोवंडी- शिवाजीनगरमध्ये एका पाण्याच्या ड्रममध्ये सापडलेल्या महिलेल्या मृतदेहाचे गूढ शिवाजीनगर पोलिसांनी मोठ्या खुबीने उकलले आहे. नवी मुंबईतील करावे गावातून ड्रममधून हा मृतदेह आणून शिवाजी नगरात आरोपीने ठेवला होता. पोलिसांनी मुंबई-पुणे मार्गावरील सात ते आठ सिग्नल्सवरील सीसीटीव्ही फुटेज तपासून अखेर आरोपीला जेरबंद केले आहे. बाबू पटेल असे आरोपीचे नाव असून, त्याने हत्या केलेल्या महिलेचे नाव मीना आहे. ती दादरमध्ये वेश्याव्यवसाय करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र तिची हत्या का केली, याचा खुलासा अद्याप पटेल याने पोलिसांकडे केला नसल्याची माहिती शिवाजी नगर पोलिसांनी दिली.

सीसीटीव्ही फूटेजमुळे आरोपी सापडला

शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या मागे म्हाडा कॉलनीत, ११ मे रोजी सकाळी एक अनोळखी ड्रम स्थानिक रहिवाशांना आढळला. त्यात मृतदेह असल्याचे समजताच स्थानिक नागरिकांनी, शिवाजी नगर पोलिसांना पाचारण केले. हे प्रकरण म्हणजे पोलिसांसाठी एक आव्हान होते. कारण त्या महिलेची ओळख पटत नव्हती. दुसरे म्हणजे घटनास्थळी कोणताही सुगावा नव्हता. पोलिसांनी म्हाडा कॉलनीत चौकशी केल्यानंतर शिवाजी नगरच्या सात, आठ सिग्नल्सवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले.

ड्रमात ठेवला होता मृतदेह

आरोपीपर्यंत जाण्यासाठी पोलिसांनी फुटेजच्या आधारे मुंबईत आलेल्या टेम्पोचा शोध घेतल्यानंतर वाशी एपीएमपी मार्केटमध्ये टेम्पोचालकाला ताब्यात घेतले. त्याने पटेलचे सर्व वर्णन सांगत आपला टेम्पो भाड्याने घेतला होता असे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी पहिल्या टेम्पोचा शोध घेतला. नंतर ज्या रिक्षात मृतदेहाचा ड्रम आणला होता. त्याचाही शोध घेतला आणि अखेर आरोपीपर्यंत पोलीस पोहोचले. आरोपीला सहा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. मात्र त्याने हत्येचे कारण सांगितले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक

पटेल हा काही वर्षांपूर्वी शिवाजी नगर येथे राहत असल्याने येथील गल्ली बोळांची त्याला माहिती होती. त्यामुळे हा खून पचेल या हेतूने त्याने हा ड्रम तेथे ठेवला. तपास करणाऱ्या पोलिसांना आता १५ हजार रुपयांचे खास बक्षिसही देण्यात आले आहे.

First Published on: May 25, 2018 12:50 PM
Exit mobile version