नागपाडा पोलीस रुग्णालय बनले पोलिसांसाठी रजामंजुरीचे केंद्र

नागपाडा पोलीस रुग्णालय बनले पोलिसांसाठी रजामंजुरीचे केंद्र

प्रातिनिधिक फोटो (सौजन्य- गुगल)

मुंबई पोलिसांना ऐनवेळी योग्य त्या उपचारासाठी नागपाडा परिसरात उभारण्यात आलेले पोलीस रुग्णालय सध्या रजामंजुरीचे केंद्र बनले आहे की काय, असे वाटु लागले आहे. रुग्णालयाची सुसज्ज इमारत असूनसुद्धा योग्य त्या तंत्रज्ञानाची आणि नीटनेटकेपणाची जोड नसल्याने या रुग्णालयात पोलीस उपचार घेत नसल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांना सहकुटुंबासहीत उपचार घेता यावेत यासाठी या रुग्णालयाची सोय करण्यात आली होती. पण मुंबई पोलीस दलातील कित्येक अधिकारी आजही या रुग्णालयाकडे फिरकत नाहीत.

रात्रंदिवस जनतेच्या रक्षणासाठी झटणार्‍या मुंबई पोलीस दलातल्या पोलीस बांधवांसाठी उभारण्यात आलेल्या या रुग्णालयाची अवस्था सध्या बिकट आहे त्यामुळे या रुग्णालयाचे डागडुजीचे कामही नीट होत नाहीत. उपचारादरम्यान वारंवार औषधांचा तुटवडा पडल्याने कित्येक पोलीस कर्मचारी या रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन खाजगी रुग्णालयात उपचार घेतात. रुग्णालयाच्या अनेक भिंतींचे डागडुजीचे काम होणे बाकी आहे. रुग्णालयाच्या कामासाठी निधी मंजूर केला जातो. पण, त्यातून डागडूजी होत नसल्याचा आरोप पोलीस दलातील कर्मचारी करतात.

काही वर्षांपूर्वी मुंबई पोलीस दलात काम करणार्‍या कर्मचार्‍यांना आजारपणात सुट्टी हवी असेल तर या नागपाडा पोलीस रुग्णालयातून आजारी असल्याचे सर्टिफिकेट देणे बंधनकारक करण्यात आले होते. त्यानुसार त्याची अंमलबजावणी करण्यातही आली. उपचार घेण्यासाठी येणारे पोलीस कर्मचारी आणि सुट्टीसाठी लागणारे आजारी असल्याचे सर्टिफिकेट मागण्यासाठी जास्त पोलीस कर्मचारी येत असल्याचे दिसून आले आहे. वर्षभरात उपचार घेण्यासाठी येणार्‍या पोलिसांची संख्या खूपच कमी झाली असून काही वर्षांनंतर नावापुरतेच पोलीस रुग्णालय म्हणून राहील की काय, अशी शंका तेथील डॉक्टर व्यक्त करतात.

सुट्टीसाठी सर्टिफिकेट मिळवण्यासाठी पोलीस डॉक्टरांंना पैसे देतात. रजामंजुरी करून घेण्यासाठी पोलिसांना लागणारे नागपाडा रुग्णालयाचे सर्टिफिकेट बंधनकारक असल्याने पोलीस सुट्टीसाठी लागणारे सर्टिफिकेट डॉक्टरांकडून पैसे देऊन घेतात. थोडक्यात हे सर्टिफिकेट विकत घेतल्यासारखी अवस्था निर्माण झाली आहे.

मधुमेहाच्या औषधाचासुद्धा पडतो तुटवडा

नागपाडा पोलीस रुग्णालयात चक्क मधुमेहाच्या औषधाचासुद्धा तुटवडा पडत असल्याचा धक्कादायक आरोप एका पोलीस कर्मचार्‍याने केला आहे. उपचार घेण्यासाठी ते रुग्णालयात दाखल झाले होते. मात्र, तेथील अस्वच्छता आणि औषधांचा तुटवडा पडत असल्याचे निदर्शनास येताच त्यांनी रुग्णालयातून डिस्चार्ज घेतला आणि खाजगी रुग्णालयात उपचार घेतले.

First Published on: January 15, 2019 5:25 AM
Exit mobile version