नायगाव-भाईंदरकरांची प्रतीक्षा संपली

नायगाव-भाईंदरकरांची प्रतीक्षा संपली

Bhayandar Naigaon Bridge

वर्ष 2013 साली मान्यता मिळालेल्या नायगाव-भाईंदर खाडी पुलाची अखेर निविदा प्रसिद्ध झाली आहे. सहा वर्षांपूर्वी 875.54 कोटींचे हे काम विलंब झाल्याने आता 1100 कोटींवर गेले आहे. नायगाव-भाईंदर खाडीवर सहापदरी पुलाला 2013 साली मान्यता देण्यात आली. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे सहा वर्षांपासून हा प्रकल्प रखडला होता. नायगांव, वसई, नालासोपारा, विरार या शहरांतून लाखो लोक दररोज कामानिमित्त मुंबईला जात असतात. त्यात पेन्शनसाठी जाणार्‍या वृद्धांचा आणि शिक्षणासाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांचाही त्यात मोठ्या प्रमाणात समावेश आहे. त्यासाठी या सर्वांना दुसरा मार्ग नसल्यामुळे लोकलवर अवलंबून रहावे लागते. ही बाब लक्षात घेऊन आमदार हितेंद्र ठाकूर यांनी या खाडीवरील जुना रेल्वे पूल भंगारात न काढता हलक्या वाहनांसाठी खुला करावा, अशी मागणी सातत्याने केली होती.

मुंबईला जाण्यासाठी लोकल व्यतिरिक्त महामार्ग क्र.8 चा पर्याय आहे. मात्र, या मार्गाने जाण्यासाठी स्वतःच्या वाहनाशिवाय पर्याय नाही. तसेच इंधन, पैसा आणि वेळेचाही अपव्यय होत असल्यामुळे खाडीपूल हा जवळचा मार्ग असल्याचे हितेंद्र ठाकूर यांनी आपल्या मागणीत नमूद केले होते. अनेक वर्षे पाठपुरावा केल्यानंतर त्यांच्या या मागणीला आता यश आले असून, या खाडीवरील तीनपदरी पुलाची निविदा ‘एमएमआरडीए’ने नुकतीच प्रसिद्ध केली आहे.

2013 ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एमएमआरडीएच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. यावेळी या प्राधिकरणाचे सदस्य म्हणून वसई-विरारचे महापौर नारायण मानकर उपस्थित होते. या तीनपदरी पुलाच्या कामासाठी 875.54 कोटी रुपयांचीही मान्यता देण्यात दिली होती. तीन वर्षांत हे काम पूर्णत्वास येणार होते. पुलासाठी 718.12 कोटी रुपये आणि पाणजु बेटाच्या रस्त्यासाठी 2.25 कोटी रुपये तसेच भूसंपादन, सेवा वाहिन्यांचे स्थलांतर आणि इतर खर्च मिळून 875.54 कोटी रुपये खर्च होणार होता. आता हा खर्च वाढला आहे. या पुलाला समांतर दहिसर-भाईंदर, वसई-विरार असा रस्ताही तयार करण्यात येणार आहे.

या पुलाची निविदा प्रसिद्ध झाल्यामुळे संपूर्ण वसई तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या निविदेला 15 ऑक्टोबरपर्यंत अंतिम मंजुरी मिळणार आहे. त्यानंतर पुढील दोन वर्षांत हा पूल पूर्णत्वास येणार आहे. अशी माहिती एमएमआरडीएचे प्रकल्प संचालक दिलीप कवठकर यांनी दिली. या पुलामुळे वसईकरांचे थेट रस्त्याने मुंबईला जाण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. तसेच या पुलामुळे रेल्वेवरील ताणही कमी होणार आहे.

पुलामुळे वसई-भाईंदर १० मिनिटांत
भाईंदर खाडीवरून रेल्वेपुलाला समांतर असा हा पूल असणार आहे. त्याची लांबी पाच किलोमीटर तर रुंदी 30 मीटर असेल. सहापदरी असलेल्या या पुलाला भाईंदर, पाणजू आणि नायगांव या तिन्ही ठिकाणी उतार असेल. नायगाव पुलाला उतार मिळाल्यानंतर तो रिंग रुटला जोडला जाईल. भाईंदर पूल नेताजी सुभाषचंद्र मार्गाला जोडून पुढे दहिसरपर्यंत जाईल. त्यामुळे वसईहून वाहनाने निघालेली व्यक्ती 10 मिनिटात भाईंदर आणि तिथून पुढे मुंबईला जाऊ शकेल. नायगाव आणि भाईंदर खाडी दरम्यान, असलेल्या पाणजू बेटावरील गावाला या पुलाचा सर्वात जास्त लाभ होणार आहे. या बेटावर जाण्यासाठी सद्या बोट आणि रेल्वेपुलावरून चालत जाण्याचा पर्याय आहे. भाईंदर खाडीवरील पुलाला पाणजू गावात उतार देण्यात आल्यामुळे या गावात थेट रस्त्याने जाता येणार आहे.

First Published on: June 22, 2019 5:03 AM
Exit mobile version