अंमली पदार्थ आणि नशाबाजांविरोधात नायगावकर आक्रमक

अंमली पदार्थ आणि नशाबाजांविरोधात नायगावकर आक्रमक

Naigaon

वसई:- गावात फोफावलेल्या अंमली पदार्थांच्या अड्ड्यांविरुद्ध खोचिवडे आणि नायगावकर आक्रमक झाले असून,असे अड्डे बंद उद्ध्वस्त करतानाचा नशाबाजांना मारहाण करण्यात आली आहे. नायगाव रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील खोचिवडे आणि नायगाव परिसरात मोठ्या प्रमाणात चरस,गांजा आणि अफुसारख्या अंमली पदार्थ्यांचे अड्डे सुरु झाले आहेत.या अंमली पदार्थांची जोरदार विक्री करण्यासाठी मादक पदार्थांच्या माफियांनी तरुण मुलांना विशेषतः महाविद्यालयीन तरुणांना नादाला लावले आहे. सुरुवातीला अशा मुलांना टार्गेट करून त्यांना मोफत किंवा अल्पदरात चरस, गांजा, अफु, हिरोईन उपलब्ध करून देण्यात आली. त्यावेळी त्यांना या पदार्थांचे सेवन कसे करायचे याचे धडेही देण्यात आले.

काही तरुण या चरस,गांजाच्या आहारी गेल्यानंतर त्यांना माल पाहिजे असेल तर आणखी विद्यार्थ्यांना घेवून या असे सांगण्यात आले. त्यामुळे हे विद्यार्थी आपली नशा भगवण्यासाठी नवीन विद्यार्थ्यांना आकर्षित करू लागले. नायगाव,खोचिवडे येथील मच्छिमार विद्यार्थी या नशेच्या आहारी गेल्याचे गावातील जागरूक तरुण आणि जेष्ठांच्या निदर्शनास आले.आपली तरुण पिढी नशेच्या आहारी जावून बर्बाद होत असल्याचे पाहून गावात हालचाली सुरु झाल्या.
त्यानंतर रविवारी ग्रामस्थ रस्त्यावर उतरले,पाहता-पाहता चारशे ते पाचशे ग्रामस्थ जमले त्यांनी चरस, गांजाचे अड्डे शोधून त्यावर हल्लाबोल केला. या अड्ड्यात असलेल्या नशाबाजांची धुलाईही करण्यात आली. त्यानंतर तेथील अंमली पदार्थ आणि नशाबाजांना पोलीसांच्या हवाली करण्यात आले.

गावातील तरुण विशेषतः 18 वर्षाखालील विद्यार्थी अंमली पदार्थांच्या आहारी गेल्याचे पाहून खूप यातना झाल्या. त्यामुळे आम्ही सर्वांनी एकत्र येवून, या तरुणांचे प्रबोधन करणे,अड्डे उध्वस्त करणे, पोलीसांना कळवणे आणि वेळ प्रसंगी चोप देण्याचे सुरु केले आहे, असे योगेश नायगांवकर या तरुणाने सांगितले. तर तरुण पिढी आणि त्यांच्यावर विसंबून असणार्‍या पालकांच्या भल्यासाठी आम्ही हे पक्षविरहीत आंदोलन सुरु केले आहे. अशा नशाबाजांनी ग्रामस्थांच्या या आंदोलनाचा धसका घेतला पाहिजे असे आमचे आंदोलन असणार आहे, असे प्रविण वर्तक या ग्रामस्थांनी सांगितले.

First Published on: October 31, 2018 1:49 AM
Exit mobile version