मुंबईत मेट्रो स्टेशनची नावंही विकली जाणार; करोडोंची उलाढाल

मुंबईत मेट्रो स्टेशनची नावंही विकली जाणार; करोडोंची उलाढाल

मुंबईत मेट्रो स्टेशनची नावे कोट्यवधींना विकली जाणार!

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या मेट्रो ३ कॉरिडोरच्या स्थानकांची नावं लवकरच खाजगी संस्थांच्या नावे देण्यात येणार आहेत. कोणतीही व्यक्ती किंवा संस्था पैसे देऊन या स्थानकांना नाव देऊ शकते. मेट्रो स्टेशन खाजगी मालमत्तांशी जोडल्यानंतर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (एमएमआरसीएल) खाजगी संस्थांची नावे स्थानकांच्या नावांशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी एमएमआरसीएलने निविदा मागविल्या आहेत. या योजनेद्वारे महसूल मिळविण्याचा एमएमआरसीएलचा उद्देश आहे.

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मार्गिकेच्या भुयारीकरणाचे काम वेगात सुरू आहे. त्यानुसार आत्तापर्यंत ७३ टक्क्यांपेक्षा जास्त भुयारीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. या मार्गिकेवर एकूण २७ मेट्रो स्थानकं असणार आहेत. २०२१ पर्यंत ही मार्गिका सुरू करण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. मेट्रोच्या मार्गिकेचे बांधकाम पूर्ण होण्यापूर्वीच एमएमआरसीएलने मिळकतीचे अन्य मार्ग शोधण्यास सुरूवात केली आहे. देशातील सर्वात लांब भूमिगत मेट्रोच्या स्थानकांच्या नावांसोबत स्वतःचे नाव जोडण्यासाठी लोकांना करोडो रुपये खर्च करावे लागणार आहेत.

१ ते ५ कोटी रुपयांपर्यंतचा खर्च

जाणकारांच्या मते, मेट्रो ३ मार्गिकेमधील स्थानकांच्या नावांशी स्वतःचे नाव जोडण्यासाठी लोकांना १ ते १० कोटी रुपयांपर्यंत खर्च करावा लागणार आहे. कारण की, ३३ किमी. लांब असणाऱ्या मेट्रो ३ मार्गिकेमध्ये मुंबईतील अनेक व्यावसायिक संस्था, हॉस्पिटल, महाविद्यालयं आणि हाऊसिंग सोसायटी आहेत. त्यामुळे प्रीमियम स्थानकांवर एका वर्षासाठी स्वतःचे नाव लिहिण्यासाठी संस्थांना १ ते ५ कोटी रुपयांपर्यंतचा खर्च करावा लागणार आहे.

महसुलाचा नवा मार्ग

त्याचप्रमाणे सीएसएमटी, बीकेसी आणि एअरपोर्टच्या स्थानकांसोबत स्वतःचे नाव जोडण्यासाठी ५ ते १० कोटी रुपये खर्च करावे लागू शकतात. अशाप्रकारे मेट्रो प्रशासनाची अनेक वर्षं कोट्यवधी रुपयांची कमाई होऊ शकते. अशाप्रकारे एमएमआरसीएलने महसुलाचा नवा मार्ग शोधला आहे.

First Published on: January 6, 2020 11:02 AM
Exit mobile version