कालिदास कोळंबकर भाजपामध्येच जाणार? दिले अप्रत्यक्ष संकेत!

कालिदास कोळंबकर भाजपामध्येच जाणार? दिले अप्रत्यक्ष संकेत!

काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर काँग्रेसचे, भाजपाचे की नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे? अशी जोरदार चर्चा सुरू असतानाच नुकतेच कालिदास कोळंबकर हे भाजपाच्या वाटेवर असल्याचे वृत्त समोर आले आहे. मात्र, मुख्यमंत्री गेल्या अनेक वर्षांपासूनची नायगावमधील रखडलेली काम पूर्ण करत असल्याने ‘जो माझ्या नायगाव वासियांची कामे करेल, त्याचा मी’ असे सांगून कोळंबकरांनी जवळपास भाजपमध्येच जाण्याचा निर्धार केला आहे. ‘माय महानगर’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले. त्यामुळे येत्या काळात मुंबई काँग्रेसमध्ये मोठा गोंधळ उडण्याची शक्यता आहे. तसेच, कोळंबकरांसारखा नेता गळाला लागल्यामुळे भाजपसाठी मुंबईत चांगला फायदा होण्याची शक्यता आहे.

‘काँग्रेसमध्ये काम करण्याची इच्छाशक्तीच नाही’ 

‘मी गेल्या अनेक वर्षांपासून बीडीडी चाळींचा, पोलीस वसाहतींचा प्रश्न सभागृहात मांडत होतो. मात्र, त्यावेळी कुणीच त्याच्याकडे लक्ष दिले नाही. पोलिसांना मागचे सरकार बाहेर घरे देत होते. मात्र नायगावमधील हाऊसिंगच्या महत्त्वाच्या प्रश्नांकडे मुख्यमंत्री जातीने लक्ष घालत असून, काँग्रेसमध्ये काम करण्याची इच्छाशक्तीच दिसत नाही,’ असा आरोप कोळंबकरांनी केला आहे. त्यामुळे कोळंबकर यांनी जणू मुख्यमंत्र्यांचे कौतुकच केल्याचे पहायला मिळात आहे.


तुम्ही हे वाचलंत का? – काँग्रेसने माझा विश्वासघात केला – नारायण राणे


राणेंवरही कोळंबकर नाराज!

कालिदास कोळंबकर हे राणेंचे कट्टर समर्थक मानले जातात. ‘जिथे राणे तिथे कोळंबकर’ हे जणू समीकरणच आहे. शिवसेनेची साथ सोडून काँग्रेसमध्ये राणेंसोबत आलेल्या आमदारांपैकी एकमेव आमदार कालिदास कोळंबकर हे राणेंसोबत राहिले आहेत. मात्र, ‘माय महानगर’शी बोलताना त्यांनी ‘निष्ठा-बिष्ठा मी पुष्कळ पाहिल्या. निष्ठेपायी मी काय केले हे सगळ्यांनाच माहीत आहे’, असे सांगत त्यांनी जणूकाही नाव न घेताच राणेंवर नाराजी बोलून दाखवत राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात जाणार नसल्याचे अप्रत्यक्ष संकेत दिले आहेत. त्यामुळे एकेकाळचे राणेंचे कट्टर समर्थक कालिदास कोळंबर आता राणेंना न विचारताच भाजपामध्ये जात आहेत का? असा सवाल देखील या निमित्ताने उपस्थित होत आहे. तसेच, ‘नारायण राणे ग्रामीण भागात काम करतात आणि मी शहरी भागात काम करतो. त्यामुळे जरी ते माझे जवळचे मित्र असले तरी देखील त्यांची बॅटिंग वेगळी’ असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे कालिदास कोळंबकर आता भाजपामध्ये अधिकृत कधी प्रवेश करतील? असाच प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.

पाहा सविस्तर मुलाखत:

First Published on: September 25, 2018 7:54 PM
Exit mobile version