वडाळ्याचे आमदार कोळंबकर भाजपच्या वाटेवर ?

वडाळ्याचे आमदार कोळंबकर भाजपच्या वाटेवर ?

निवडणुका तोंडावर आल्याने आगामी काही दिवसांत राजकीय नेत्यांचा पक्षांतराचा खेळ सुरु होईल. मुंबईत गणेशोत्सवात लावलेल्या एका बॅनरच्यानिमित्ताने याची झलक पाहायला मिळाली. या होर्डिंगच्या माध्यमातून कोळंबकरांनी एका दगडात अनेक पक्षी मारल्याची चर्चा आहे. कोळंबकरांनी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देण्यासाठी हा बॅनर लावला आहे. मात्र, या बॅनरवर काँग्रेस नेत्यांऐवजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रसाद लाड यांची छायाचित्रे झळकत आहेत. त्यामुळे कोळंबकर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. विशेष म्हणजे ते नारायण राणे यांचे समर्थन समजले जातात. असे असूनही त्यांच्या बॅनरवर राणेंना स्थान कसे नाही, अशी चर्चा होत आहे. नारायण राणेंचे कट्टर समर्थक असल्याने त्यांनी आजवर घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी केली.

राणेंनी सेनेला रामराम ठोकला तेव्हा त्यांच्याबरोबर सेनेतून बाहेर पडलेल्यांमध्ये कोळंबकर यांचा समावेश होता. काँग्रेसपासून फारकत घेऊन राणे बाहेर पडले तेव्हापासून कोळंबकर यांनी काँग्रेस पक्षापासून दुरावा राखला. राणे यांनी भाजपशी जवळीक साधल्याच्या पार्श्वभूमीवर कोळंबकर हे काँग्रेस पक्षातून बाहेर पडून भाजपत दाखल होतील, असा अंदाज व्यक्त केला जात होता. विशेष म्हणजे कोळंबकर हे विरोधी पक्षात असतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या वडाळा-नायगाव या मतदारसंघातील विकास कामांसाठी भरघोस निधी देऊन कृपादृष्टी ठेवली आहे. गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कोळंबकर यांच्या शुभेच्छा जाहिरातींवर ते ज्या पक्षात आहेत त्या काँग्रेस पक्षाचा एकही नेता नाही. उलट मुख्यमंत्री फडणवीस आणि आमदार प्रसाद लाड यांना स्थान देत कोळंबकर यांनी त्या पक्षाप्रती आपली जवळीक स्पष्ट केल्याचे बोलले जात आहे.

First Published on: September 25, 2018 5:00 AM
Exit mobile version