राष्ट्रीय स्पर्धा जिंकण्याचे जान्हवीचे स्वप्न अपूर्णच राहिले

राष्ट्रीय स्पर्धा जिंकण्याचे जान्हवीचे स्वप्न अपूर्णच राहिले

कॅरम हाच तिचा ध्यास होता. जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर तिने खेळाची चमक दाखवली होती. त्यामुळे २० वर्षीय वयोगटात राष्ट्रीय स्पर्धेसाठी कॅरमपट्टू जान्हवी मोरे हिची नुकतीच निवड झाली होती. ही स्पर्धा जिंकण्याचे तिचे स्वप्न होते. त्यासाठी ती खूप मेहनत घेत होती. पण त्यापूर्वीच काळाने तिच्यावर झडप घातली आणि तिचे स्वप्न अपूर्ण राहिले. जान्हवीचा अपघाती मृत्यू झाल्याने डोंबिवलीत हळहळ व्यक्त होत आहे. आज, सोमवारी तिच्या पार्थिवावर अंतिमसंस्कार करण्यात आले. यावेळी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातून अनेक कॅरम खेळाडू आणि शहरातील मान्यवर मंडळी उपस्थित होती.

भरधाव टँकरने दिली धडक 

कल्याण शीळ रोडवरील लोढा मिडोज येथे जान्हवी राहत होती. कॅरम स्पर्धेची तिचा सराव सुरूच होता. रविवारी कर्जत येथे राहणारे कॅरमपट्टु आशय पीम्पूटकर आणि जान्हवी यांचा घरातच कॅरमचा सराव करत होते. कॅरमचा सराव आटोपल्यानंतर संध्याकाळी डोंबिवलीकडे जाण्यासाठी दोघेही निघाले. लोढा सर्कल बस स्टॉप येथे पायी जात असतानाच डोंबिवलीकडून कल्याण शीळकडे जाणाऱ्या एका भरधाव टँकरने जान्हवीला धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने जान्हवीचा मृत्यू झाला. बेदरकारपणे टँकर चालवणारा चालक रोहिदास बटूळे याला मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे.

राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली होती निवड

जान्हवी मॉडेल कॉलेजमध्ये बी. कॉम. च्या दुसऱ्या वर्षात शिकत होती. जिल्हास्तरीय राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर तिने आपल्या खेळाचा ठसा उमटवून अनेक पारितोषिक मिळवली होती. जान्हवी हिला बँक ऑफ इंडियाकडून शिष्यवृत्ती मिळत होती. जान्हवी नेहमी हसतमुख व मृदुभाषी असा तिचा स्वभाव होता. जान्हवीने २०१५ साली राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत जुनिअर राज्य विजेतेपद पटकावून खेळाची सुरुवात केली होती. सब-जुनिअर आणि जुनिअर राष्ट्रीय स्पर्धेत तिने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते. अवघ्या २० वर्षाच्या जान्हवीने नुकत्याच नागपूर येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धांतील युवा गटात कांस्य पदक पटकावले होते. सीनियर गटातही चांगली कामगिरी करत असल्याने भविष्यात महाराष्ट्राला तिच्याकडून खूप अपेक्षा होत्या. काही महिन्यांवर येवून ठेपलेल्या आंतर २० वर्षीय वयोगटाच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली होती. या स्पर्धेसाठी तिची जोरदार प्रॅक्टीस सुरू होती. ही स्पर्धा जिंकण्याचे तिचे स्वप्न होते, मात्र त्या आधीच काळाने तिच्यावर झडप घातली. लोढा येथील स्मशान भूमीत तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तिच्या घरी आई वडील, भाऊ असून भाऊ हर्षल बारावीमध्ये शिकत आहे. वडिलांचा व्यवसाय असून आई गृहिणी आहे. जान्हवीच्या अपघाती मृत्यूने मोरे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तर डोंबिवलीकरही हळहळले आहेत.

First Published on: May 13, 2019 6:29 PM
Exit mobile version