वर्ष झाले तरी सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिंद्रे बेपत्ताच

सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे प्रकरणाचा तपास गेल्या दोन महिन्यांपासून संथगतीने सुरु असून त्याला गती द्या, यापूर्वी ज्या अधिकार्‍याकडे या प्रकरणाचा तपास होता पुन्हा त्यांनाच तपासाची जबाबदारी द्या आणि तत्कालीन पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांना सहआरोपी करा अशा मागण्यांसह सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे यांनी नवनिर्वाचित नवी मुंबई पोलीस आयुक्त संजयकुमार यांची भेट घेतली.आपण माझ्या पत्नीला न्याय मिळवून द्या अशी मागणी केली.

तत्कालीन नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्या बदलीनंतर अश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे यांनी नवे पोलीस आयुक्त संजय कुमार यांची शनिवारी भेट घेतली. त्यावेळी त्यांनी गेल्या वर्षभरातला लेखाजोखा कुमार यांच्या समोर मांडला असता या प्रकरणात अभ्यास करून योग्य ती पावले उचलण्यात येतील, असे आश्वासन आयुक्तांनी गोरे यांना दिले. यापूर्वी बेपत्ता प्रकरणात सप्टेंबर २०१६ रोजी गोरे यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांची भेट घेतली होती.या भेटीत काहीही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही.तसेच कोणतेही सहकार्य न करता उलट आम्हालाच भीती दाखविण्याचा प्रयत्न नगराळे यांच्याकडून करण्यात आला.

या प्रकरणात तुमच्या जीवाला धोका आहे,तुम्ही सावध रहा असे आयुक्तांनी त्यावेळी त्यांना सांगितले .पोलिसांकडे या प्रकरणात कुरुंदकर आरोपी असलेल्या ऑडिओ व्हिडीओ उपलब्ध असताना देखील पोलिसांनी कुरुंदकर विरोधी गुन्हा दाखल केला नव्हता.पोलीस सहकार्य करीत नसल्याने ऑक्टेबर २०१६ मध्ये आम्ही न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने यासंदर्भात तपासाला गती दिली .त्यांनतर सहाय्यक पोलीस आयुक्त प्रकाश निलेवाड आणि पोलीस निरीक्षक संगीता अल्फान्सो यांची या प्रकरणात तपास अधिकारी म्हणून नियुक्ती केली.
३१ जानेवारी २०१७ रोजी अश्विनी बेपत्ता असल्याचा गुन्हा कळंबोली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. या प्रकरणात काहीच बाहेर येत नसल्याने १६ नोव्हेंबर २०१७ रोजी प्रसार माध्यमांच्या समोर हा विषय आला . अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरण केवळ प्रसार माध्यमांमुळे बाहेर आले . प्रसार माध्यमांनी बातम्या दाखविल्यानांतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असे यावेळी अश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे यांनी सांगितले.

माझ्या पत्नीची हत्या होऊन वर्ष उलटले तरी तिचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. तिच्यावर झालेल्या अन्यायाबाबत तत्कालीन पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी हलगर्जीपणा केला असून त्यांनाच या प्रकरणात सहआरोपी करा,आणि या प्रकरणाचा तपास ज्यांच्याकडे होता पुन्हा त्यांच्याचकडे देण्यात यावा, अशी मागणी आम्ही पोलीस आयुक्त संजय कुमार यांच्याकडे केली आहे.
-राजू गोरे ,अश्विनी बिंद्रे यांचे पती

First Published on: August 25, 2018 4:30 AM
Exit mobile version