फडणवीसांचा इशारा आणि महाविकास आघाडीच्या या नेत्यांचे वाजले बारा

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना ईडीकडून आज अटक करण्यात आली . न्यायालयात याप्रकरणाची चौकशी सुरू असून मलिक यांना न्यायालयीन कोठडी मिळणार की ईडीची कोठडी याकडे सर्वांचे लक्ष आहे. दरम्यान,याप्रकरणी मलिक यांना राजीनामा द्यावा लागणार आहे. कारण एखाद्या मंत्र्याला अटक झाल्यानंतर त्याची पारदर्शक चौकशी व्हावी यासाठी त्याला राजीनामा हा द्यावाच लागतो. यामुळे मलिक यांनाही पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. मलिक यांनी राजीनामा दिल्यास महाविकास आघाडीमधील तिसऱ्या नेत्याचा हा राजीनामा ठरणार आहे. याआधी वनमंत्री संजय राठोड, गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही राजीनामा द्यावा लागला आहे.

काही दिवसांपासून ईडीकडून दाऊद इब्राहीम मनीलाँर्डिंग प्रकरणाची चौकशी सुरू आहे. यावेळी दाऊद याचा भाऊ इकबाल कासकर आणि बहीण हसीना पारकर यांचीही चौकशी करण्यात आली. चौकशीत मुंबईतील जमीन व्यवहारांशी संबंधित असलेल्या या प्रकरणात मलिक यांचे नावही आले. यामुळेने त्यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे.

दरम्यान मलिक यांना अटक होणार याचे सुतोवाच काही दिवसांपूर्वी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले होते . तेव्हापासून मलिक ईडीच्या रडारवर असल्याचे बोलले जात होते. असाच इशारा फडणवीस यांनी संजय राठोड आणि अनिल देशमुख यांच्या अटकेआधीही दिला होता.  त्यानंतर आता फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्याकडून वारंवार   खासदार संजय राऊत, प्रताप सरनाईक, रविंद्र वायकर, अनिल परब यांच्यावरही ईडी कारवाई होणार असा इशारा दिला जात आहे. यामुळे येत्या काही दिवसात ईडीची वक्रदृष्टी  यांपैकी पहीली कोणावर पडणार हे पाहायला मिळणार आहे.

First Published on: February 23, 2022 6:16 PM
Exit mobile version