‘धमकी आली’ हा म्हाडाच्या अध्यक्षांचा डाव – नवाब मलिक

‘धमकी आली’ हा म्हाडाच्या अध्यक्षांचा डाव – नवाब मलिक

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक

‘म्हाडामधील वरिष्ठ अधिकाऱ्यांना जास्त अधिकार असतात पण ते सगळे अधिकार मर्यादित अधिकार असलेल्या म्हाडाच्या अध्यक्षांना हवे आहेत. त्यामुळे त्यांनी ‘धमकी आल्याच्या’ हा डाव खेळला आहे’, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. म्हाडाचे अध्यक्ष आमदार उदय सामंत यांना बिल्डरांकडून धमक्या येत असल्याचा प्रकरणी मिडियाच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारला असता, नवाब मलिक यांनी शिवसेना आमदार उदय सामंत यांचा चांगलाच समाचार घेतला. शिवसेनेचे आमदार आणि म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांच्या जीवाला धोका आहे आणि त्यांना बिल्डर मारण्याच्या धमक्या देत असल्याचा ते खोटा दावा करत आहेत. त्यामुळे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. म्हाडाचे अधिकारी त्यांचे ऐकत नाहीत का? त्यांना वेगळया पध्दतीने कारभार करायचा आहे का? असा सवालही नवाब मलिक यांनी यावेळी उपस्थित केला. 


वाचा: मुंबई म्हाडाच्या लॉटरीत भ्रष्टाचार – निलेश राणे

यावेळी पत्रकरांशी बोलताना नवाब मलिक म्हणाले, म्हाडाच्या अध्यक्षांना कार्यकारी अधिकार नसतो. परंतु यावरुनच अधिकारी व अध्यक्षांमध्ये वाद सुरु आहे. त्यामध्ये काहीतरी वेगळी ठिणगी टाकून अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा अध्यक्षांचा डाव आहे. म्हाडा अध्यक्षांच्या या कुटनितीची लवकरात लवकर चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही मलिक यांनी यावेळी केली. म्हाडाच्या अध्यक्षांना समितीची बैठक लावणे आणि अध्यक्षांसमोर आलेल्या प्रस्तावांना मंजुरी देणे इतकेच मर्यादित अधिकार असतात. कार्यकारी अधिकाऱ्यांना मात्र याहून जास्त आणि जवळपास सर्वच अधिकार असतात. नेमके हेच सगळे अधिकार म्हाडाचे अध्यक्ष आ. उदय सामंत यांना हवे आहेत, असा आरोप नवाब मलिक यांनी यावेळी केला.

First Published on: December 19, 2018 10:00 PM
Exit mobile version