नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात लॅबच नाहीत

नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात लॅबच नाहीत

नवी मुंबई महापालिका मुख्यालय

नवी मुंबईत डेंग्यू आणि स्वाईन फ्ल्यूचा आजार बळावला आहे. मात्र महापालिकेच्या एकाही रुग्णालयात आणि २२ आरोग्य केंद्रांत या रोगांची तापसणी करण्यासाठी लॅब नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. रुग्णांना खासगी लॅबमध्ये जाऊन ३ ते ६ हजार रुपये खर्च करावे लागत आहेत. आरोग्य सेवेवर कोट्यवधी रुपये खर्च करणारी महापालिका स्वतःचा लॅब काढू शकत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पालिकेने लॅब सुरू करून गरीब रुग्णांना दिलासा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘अ’ प्रभाग समिती सदस्य अफसर इमाम यांनी आयुक्तांची भेट घेऊन त्यांना निवेदन देऊन केली आहे.

कोट्यवधी खर्च करुनही रुग्णालयात लॅब नाहीत

महापालिका रुग्णालयात अथवा आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचारासाठी गेल्यावर केस पेपर काढण्यासाठी रुग्णाला तासनतास रांगेत उभे राहावे लागते. त्यानंतर रुग्णास डेंग्यू अथवा स्वाईन फ्ल्यूची संशयास्पद लक्षणे आढळल्यास रुग्णांना खासगी लॅबमध्ये रक्ततपासणी करण्यास पाठवले जाते. त्यामुळे रुग्णाचा या तपासणींसाठी दिवस वाया जातो. त्यासाठी हजारो रुपये खर्च होतात. मुळात महापालिका रुग्णालयात अथवा आरोग्य केंद्रात येणारा रुग्ण हा आर्थिक परिस्थिती हलाकीची असल्याने नाईलाजाने येत असतो. मात्र पालिकेत रक्त तपासणी करणाऱ्या लॅब नसल्याने त्यास खासगी रुग्णालयात अथवा लॅबमध्ये जाण्यास सांगण्यात येते. त्यामुळे गरीब रुग्णांना याचा त्रास होतो. त्यामुळे आरोग्य सेवेवर कोट्यवधी रुपये खर्च करणाऱ्या पालिकेने पालिकेच्याच लॅब तयार कराव्यात, अशी मागणी ‘अ’ प्रभाग समिती सदस्य अफसर इमाम यांनी आयुक्तांना भेटून व निवेदन देऊन केली आहे.

रुग्णांच्या वाटेला असुविधा

पालिका शहरात विविध उपक्रम राबवते. देशस्तरावर अनेक पुरस्कार पटकावते. त्यासाठी विविध उपयोजन करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करते. मात्र पालिकेच्या आरोग्य विभागाला सदैव टीकेला सामोरे जावे लागत आहे. औषधांची वानवा, रुग्णांच्या वाटेला येणाऱ्या असुविधा यामुळे नागरिक हैराण आहेत. महासभा असो किंवा स्थायी समिती सत्ताधाऱ्यांपासून ते विरोधकांपर्यंत सर्वच आरोग्य विभागाचे वाभाडे काढत असतात. आयुक्त डॉ. रामस्वामी एन. यांनी आरोग्य विभागाला गांभीर्याने घेऊन अनेक उपाय योजना करण्यास सुरुवात केली आहे. यात अनेक नवीन उपकरणे खरेदी करण्यापासून ते औषधे खरेदी करण्यापर्यंत अनेक बाबींकडे लक्ष दिले आहे. सध्या नवी मुंबई शहरात डेंग्यू आणि स्वाईन फ्ल्यूचे रुग्ण आढळले आहेत.

First Published on: October 18, 2018 3:41 PM
Exit mobile version