राजकीय लोकच सुरक्षित नसतील तर सामान्य लोकांचं काय?- रोहित पवार

राजकीय लोकच सुरक्षित नसतील तर सामान्य लोकांचं काय?- रोहित पवार

मनसेचे नेते आणि माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाला. सकाळी मॉर्निंग वॉकला गेले असताना शिवाजी पार्क येथे त्यांच्यावर हा हल्ला झाला. त्यांच्यावर उपचार करून त्यांना हिंदुजा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय. मात्र मुंबईसारख्या देशाची आर्थिक राजधानी असलेल्या शहरात एका राजकीय व्यक्तीवर हल्ला झाल्यानंतर एकच खळबळ माजली आहे. या हल्ल्यानंतर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिलीय.

आजच्या अधिवेशनापूर्वी आमदार रोहित पवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांना पत्रकारांनी मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्याबाबत प्रश्न विचारले असताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिलीय. यावेळी बोलताना रोहित पवार यांनी सरकारवर ताशेरे ओढलेत. “गेल्या काही महिन्यांपूर्वी नितीन गडकरी यांना देखील धमकी मिळाली होती. जर राजकीय नेतेच सुरक्षित नसतील तर सामान्य लोकं तरी काय”, असा सवाल उपस्थित करत रोहित पवार यांनी राज्य सरकारवर टीका केलीय.

तसंच हे सरकार लोकांच्या हितासाठी स्थापन झालेलं नसून केवळ बदला घेण्याच्या हेतून स्थापन झाल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय. त्यामुळे राज्य सरकार दुसऱ्या कामात व्यस्त असून राज्यात कायदा आणि सुव्यवस्था डगमगली आहे. त्यामुळे अशा हल्ल्यांच्या घटनांची शहनिशा करून राज्य सरकारने योग्य कारवाई केली पाहिजे, अशी मागणी देखील रोहित पवारांनी केलीय.

मनसेचे नेते अमेय खोपकर, नितीन सरदेसाई यांनी सुद्धा पोलिसांनी हल्लोखोरांना शोधून काढा, असं आवाहन करत संताप व्यक्त केला आहे. संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्यानंतर हा हल्ला कुणी व का केला असावा, या चर्चांना उधाण आलं आहे.

First Published on: March 3, 2023 11:31 AM
Exit mobile version