‘पवार कुटुंबातून फक्त मीच लोकसभा लढवणार!’

‘पवार कुटुंबातून फक्त मीच लोकसभा लढवणार!’

प्रातिनिधिक छायाचित्र

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा असलेल्या पवार कुटुंबियांमधून नक्की कोण लोकसभा २०१९च्या निवडणुका लढवणार याविषयी गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईत चाललेल्या बैठकीदरम्यानही याबद्दल अनेक तर्कवितर्क लढवले गेले. यामध्ये थोरल्या पवारांपासून ते त्यांचा नातू पार्थपर्यंत सर्वांच्या नावांच्या चर्चा करण्यात आल्या. मात्र, आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. आणि तो पूर्णविराम दिला आहे खासदार सुप्रिया सुळे यांनी! ‘एबीपी माझा’शी बोलताना सुप्रिया सुळे यांनी त्याविषयी माहिती दिली आहे. यावेळी ‘ना पार्थ, ना शरद पवार, आमच्या घरातून फक्त मीच लोकसभा निवडणुका लढवण्यासाठी इच्छुक आहे’, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.

थोरल्या पवारांच्या उमेदवारीवर होती चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईत सुरू असलेल्या बैठकीदरम्यान अनेकदा पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उमेदवारीविषयी धुरळा उडाला. अनेकांनी पवार पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार असा ठोकताळा बांधला होता. तर काहींनी ते पुण्यातून नसून दुसऱ्याच कोणत्यातरी मतदारसंघातून उभे राहतील, असा अंदाज वर्तवला होता. मात्र, जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या ट्वीटमुळे शरद पवारांच्या नावाविषयीच्या चर्चा कमी झाल्या. पवार कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याचं जितेंद्र आव्हाडांनी ट्वीटमध्ये म्हटलं होतं.

पार्थच्याही नावावर चर्वितचर्वण

दरम्यान, थोरल्या पवारांच्या उमेदवारीची चर्चा निवळल्यानंतर थेट धाकटे पवार अर्थात अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवारच्या नावावर चर्चा सुरू झाली. हुकमी एक्का म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्थ पवारचा उपयोग करून घेऊ शकते असेही अंदाज व्यक्त करण्यात आले. यासंदर्भात शरद पवारांचा विरोध असल्याचं वृत्त प्रसारित झालं होतं. शिवाय यासंदर्भात विचारणा केल्यानंतर अजित पवार यांनी शरद पवारांच्या वक्तव्यावर काहीही बोलू शकत नाही असे सांगतानाच अजून काही सांगता येत नाही असंही सूचक वक्तव्य करून राळ उडवून दिली होती.


तुम्ही हे वाचलंत का? – थोरल्या पवारांचा पार्थच्या उमेदवारीला नकार? अजित पवारांचं मात्र सूचक वक्तव्य!


पार्थची चर्चा फक्त माध्यमांमध्येच! – सुप्रिया सुळे

पार्थच्या नावाची चर्चा आपण फक्त माध्यमांमध्येच ऐकली असून आमच्या घरात किंवा पक्षामध्येही पार्थच्या नावाची चर्चा झालेली नाही असं सांगत सुप्रिया सुळेंनी सर्वच राजकीय आडाखे नाकारण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, अजित पवारांनी केलेल्या सूचक वक्तव्यामुळे पक्षात पार्थच्या नावावर चर्चा झाल्याचंच सिद्ध होत आहे. मात्र, कुटुंबातल्या लोकांनी जागा घेतल्या तर कार्यकर्त्यांचं काय होणार? या शरद पवारांच्या वक्तव्याचा हवाला देत पवार कुटुंबातून फक्त मीच लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्यांचं सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.

उदयन राजेंबद्दल सूचक वक्तव्य

दरम्यान, सुप्रिया सुळेंनी यावेळी उदयन राजेंच्या उमेदवारीविषयी सूचक वक्तव्य केलं आहे. कुणी कुणाच्या उमेदवारीला विरोध केला, याविषयी आपल्याकडे माहिती नाही. मात्र, आम्ही कुणावरही तिकिटं लादणार नाही, कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय घेतला जाईल, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. त्यामुळे उदयन राजेंना पक्षाने तिकीट नाकारल्यास तो पक्षासाठी मोठा निर्णय ठरू शकतो.

First Published on: October 8, 2018 6:30 PM
Exit mobile version