शरद पवारांच्या उमेदवारीवर राष्ट्रवादीच्या बैठकीत शिक्कामोर्तब

शरद पवारांच्या उमेदवारीवर राष्ट्रवादीच्या बैठकीत शिक्कामोर्तब

शरद पवार

२००९च्या लोकसभा निवडणुकांनंतर ‘मी लोकसभा पुन्हा लढवणार नाही’ असा निर्णय जाहीर करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पुन्हा एकदा उमेदवारी प्रचाराच्या रणधुमाळीत दिसणार आहेत. गेल्या दोन दिवसांपासून यावर चर्चा सुरू होती. त्यानंतर आज अर्थात गुरुवारी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीमध्ये यावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचं सांगितलं जात आहे. ‘पवार निवडणुकीला उभे राहणार याबाबतची अधिकृत घोषणा काही दिवासांमध्ये होईल’, अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी बैठक संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना दिली आहे. तसेच, ‘मनसेबाबत देखील राष्ट्रवादी काँग्रेस सकारात्मक असून ते आम्हाला भाजपविरोधी मदत करतील, अशी आशा आहे’, असं देखील प्रफुल्ल पटेल म्हणाले आहे.

मनसे आघाडीत येण्याचं झालं निश्चित?

दरम्यान, राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी समाविष्ट करून घेण्याचं जवळपास निश्चित झाल्याचं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या बोलण्यावरून स्पष्ट होत होतं. ‘मनसे आम्हाला भाजपविरोधात मदत करेल अशी अपेक्षा आहे’, अशी प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेल यांनी दिली. तर ‘राज ठाकरे यांना आघाडीत घेण्यासंदर्भात आम्ही काँग्रेससोबत चर्चा करू, त्यासाठी राज ठाकरेंची पुन्हा एकदा भेट घेऊ’, अशी माहिती माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

२० तारखेला काँग्रेस-राष्ट्रवादीची एकत्र सभा

दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीमध्ये जागावाटप कसं असायला हवं? या बैठकीमध्ये चर्चा झाली नसली, तरी आघाडी होणारच असे संकेत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी यावेळी दिले. ‘९ तारखेला आचारसंहिता लागण्यापूर्वी उमेदवार निश्चिच होतील. त्यानंतर २० तारखेला नांदेडला काँग्रेस-राष्ट्रवादीची एकत्र सभा होईल. तर २३ तारखेला परळी-बीडमध्ये दोन्ही पक्षांची एकत्र सभा होईल’, अशी माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली. दरम्यान, दोन्ही पक्ष मिळून मित्र पक्षांसाठी २-२ जागा सोडणार असल्याचं या बैठकीत ठरल्याचं बोललं जात आहे.

First Published on: February 14, 2019 3:01 PM
Exit mobile version