एकनाथ शिंदेंना घेरण्यासाठीच (अ)विनाशस्त्र; राष्ट्रवादीच्या वाटेवरील जाधव सेनानेत्यांच्या रडारवर

एकनाथ शिंदेंना घेरण्यासाठीच (अ)विनाशस्त्र; राष्ट्रवादीच्या वाटेवरील जाधव सेनानेत्यांच्या रडारवर

संघटनात्मक पातळीवर आपल्या कामाचा जबरदस्त ठसा उमटवलेल्या स्व. आनंद दिघेंना ठाण्यातच थोपवणाऱ्या राजकीय व्यवस्थेने आता त्याच मार्गावर त्यांचे उत्तराधिकारी एकनाथ शिंदे यांच्याविरोधात मोर्चेबांधणी केली आहे. यासाठी ठाण्यातील सेनेच्या विरोधकांनी राष्ट्रवादीच्या प्रवेशाचे वेध लागलेल्या मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांचा वापर करण्याची योजना बनवली आहे. शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख स्व.आनंद दिघे यांनी आपल्या कामाच्या झपाट्याने राज्यभरात स्वत:चा वेगळा ठसा उमटवला होता. मलंग गड ते अयोध्या अश्या हिंदुत्वाच्या आंदोलनात दिघेंच्या ठळक उपस्थितीने त्यांचे पक्षातील आणि पक्षाबाहेरील विरोधक अस्वस्थ झाले होते. कोणतीही निवडणूक न लढविण्याचा पण केलेल्या स्व.दिघेंनी अनेकांना सत्तेची पदं देताना स्वत:ला मात्र ठाणे जिल्ह्याच्या सीमारेषेच्या मर्यादा घालून घेतल्या. स्व. दिघेंविरोधी कुभांड रचणाऱ्या गटाने या खेपेला त्यांचेच शिष्य असलेले ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना घेरायला सुरुवात केली आहे.

एकनाथ शिंदेंच्या वाढत्या प्रभावामुळे अस्वस्थता

सेनेच्या नेत्यांच्या यादीत आदित्य ठाकरेंनंतरचे तरुण नेते म्हणून शिंदेंचं स्थान आहे. दिघेंसारखं ठाण्यातच पक्षीय पातळीवर मर्यादित न राहता चांदा ते बांदा असा आपला राजकीय संचार करणाऱ्या शिंदेंमुळे सरकार मधील आणि पक्षातीलही एक गट प्रचंड अस्वस्थ आहे. मातोश्रीवर असलेल्या वजनामुळे महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री बनण्याच्या प्रक्रियेत शिंदेंनी ‘मराठा’ जात आणि राजकीय पत यावर जोरात मुसंडी मारली होती. त्यानंतर मुख्यमंत्री झालेल्या उध्दव ठाकरे यांनी त्यांच्याकडे नगरविकास सारखं महत्वाचं खातं त्यांच्या आधीच्या राज्य रस्ते विकास महामंडळासह दिल्याने त्यांचे विरोधक कमालीचे अस्वस्थ होऊन कार्यरत झाले आहेत.

शिवसेना नेतृत्वाशी नवा ‘याराना’ खुलवू पाहणाऱ्या राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी एकनाथ शिंदे यांना विचलित करण्यासाठी मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांचा वापर सुरु केला आहे. राजकीय आंदोलनं यशस्वी करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या मनसेकडून राजकीय नेत्यांवर कमरेखाली वार करण्याची पध्दत प्रचलित नाही. मात्र एरवी ठाण्यात मनसेला आपल्या राजकीय रडारवर न घेणाऱ्या पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एकेरी भाषेत, सामाजिक भान सोडून अविनाश जाधव यांनी टीका केली. त्यामुळे राजकरणात आपल्या अबोलपणासाठी परिचित असलेल्या शिंदेंच्या ठाण्यातील समर्थक आणि विरोधकांनीही जाधवांना टिकेचं लक्ष्य केलं आहे.

जाधवांची ‘घरातून उचलून नेण्याची’ भाषा!

आयएएस अधिकाऱ्यांना शिवीगाळ करणे, पालिका मुख्यालयात घुसून सरकारी कामात अडथळा आणणे, कोविड सेंटर मध्ये माध्यम प्रतिनिधींसह घुसून आंदोलन करणं, माध्यमस्नेहाखातर आंदोलनं करणं यामुळे अविनाश जाधव अडचणीत आले होते. त्यांच्यावर तडीपारीची नोटीस बजावण्यात आली होती. सध्या जिल्हा पातळीवर कमजोर पडलेलं राष्ट्रवादीचं स्थानिक नेतृत्व जाधवांची वर्णी लावून आपल्या हाती ठेवण्यासाठी काही नेत्यांचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र दुसऱ्या पक्षातून तेही अविनाश जाधव यांच्यासारख्या वादग्रस्त कार्यकर्त्याला जिल्हाध्यक्ष करायला ठाण्यातील अजित पवार गटानं जोरदार विरोध केला. तिथेच जाधवांची राष्ट्रवादीतील एंट्री रखडली. तडीपारीची नोटीस आणि राष्ट्रवादीची हुकलेली गाडी यामुळे निराश झालेल्या अविनाश जाधव यांनी न्यायालयातून जामीन होताच ‘घरातून उचलून नेण्याची’ भाषा केली. त्यानंतर सर्वात अगोदर युवा सेना विस्तारक राहुल लोंढे , राजन विचारे, रविंद्र फाटक, प्रताप सरनाईक यांनी जाधव यांचा खरपूस समाचार घेतला.

‘ठाण्याची शिवसेना दिघेंची शिवसेना’ असं घोषवाक्य मिरवणाऱ्या ठाण्यात एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व असलं तरी संघटना तीन ते चार गटांत विभागलेली आहे. ही सगळी गटबाजी बाजूला ठेवणण्याचं काम ठाण्यात फक्त निवडणूक काळातच होतं. ठाणे जिल्हाप्रमुख आणि महापौर नरेश म्हस्के यांनी अविनाश जाधव यांच्या दिखाऊ आंदोलनामुळे त्यांच्यावर आधीपासूनच जोरदार टीका सुरु केली होती. शिंदेंवरील टिकेनंतर राम रेपाळे, मिनाक्षी शिंदे, अशोक वैती यांनीही अविनाश जाधव यांच्या विरोधात कंबर कसली आहे. शिवसैनिकांना जाहीरपणे प्रसारमाध्यमांसमोर धमकावणं हा गुन्हा जाधव यांनी सर्वांसमक्ष केला असल्यामुळे त्यांच्यावर नव्याने गुन्हा दाखल करण्याबाबत आणि ठाण्याची शांतता अबाधित ठेवण्यासाठी आपण लवकरच पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेणार असल्याचं नरेश म्हस्के यांनी सांगितलं. तर उचलून नेण्याच्या जाधव यांच्या विधानानंतर आमदार रविंद्र फाटक यांनीही मनसेला तसाच आवाज दिल्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी फाटक यांना फोन करुन कोरोना काळात कोणत्याही गोष्टीसाठी राजकीय वातावरण न बिघडवण्याची विनंती केली. जाधवांचा समाचार घेताना प्रताप सरनाईक म्हणाले, एकनाथ शिंदे हे मोठे नेते आहेत. त्यांना काही करायचं तर सोडा आमच्या एका साध्या शिवसैनिकाला उचलून न्या. मग बघूया काय करायचं ते’.

अविनाश जाधव राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर…?

अविनाश जाधव राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर आहेत का याबाबत, त्यांनी सांगितले की, जन्माला आल्यापासून अजित पवार आणि जयंत पाटील यांना प्रत्यक्षात पाहिलेलं नाही. मी राष्ट्रवादीच्या नेत्यांपैकी फक्त जितेंद्र आव्हाड यांना ओळखतो. कारण ते ठाणेकर आहेत. मी त्यांच्याशीही महिनाभर बोललेलो नाही. मी मनसे सोडणार हा विरोधकांचा अपप्रचार आहे. मला फक्त राज ठाकरे माहिती आहेत आणि ते माझ्या रोमारोमात आहेत.मी त्यांच्याशी कधीही गद्दारी करणार नाही. मी अटकेत असताना त्यांनी केलेले उपकार मी फक्त त्यांचा- आमचा मनसे पक्ष वाढवूनच फेडू शकतो. त्यामुळे मी राष्ट्रवादीच्या वाटेवर हे साफ खोटं आहे. मी मनसेतच आहे आणि राज साहेबांबरोबरच राहणार असा विश्वास ही जाधव यांनी व्यक्त केला.

First Published on: August 17, 2020 5:32 PM
Exit mobile version