राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यावर जबर हल्ला

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यावर जबर हल्ला

रवी पाटील

एकीकडे भिवंडी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी शहापूर तालुक्यात सुरू असताना मंगळवारी रात्री उशिरा पाच ते सहा अज्ञात हल्लेखोरांच्या टोळीने आसनगाव येथील रवी पाटील या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर जबर हल्ला केल्याची घटना घडली. याबाबत शहापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकीतील आपला प्रचारदौरा आटोपून रवी पाटील हे मंगळवारी रात्री 11 .30 च्या सुमारास आपल्या काही सहकार्‍यांसह आसनगाव येथील परिवार गार्डन येथे पार्क केलेल्या आपल्या कारजवळ उतरले. त्यावेळी त्यांना आपल्या वाहनाचा पुढील एक टायर पंक्चर असल्याचे आढळले. ते गाडीजवळील टायर पाहण्यासाठी वाकले असता याचवेळेस अचानक मागून पाच ते सहा जणांनी पाटील यांना लोखंडी सळईने मारहाण करीत त्यांच्यावर हल्ला केला. या मारहाणीत त्यांच्या डोक्यावर, छाती, हातावर गंभीर अशी दुखापत झाली.

मारहाण केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. ही घटना समजताच परिवार हॉटेलमधील वेटर कर्मचारी आणि हॉटेलमधील ग्राहकांनी धाव घेत या घटनेची माहिती रवी पाटील यांच्या कुटुंबियांना दिली. दरम्यान, जखमी अवस्थेतील पाटील यांना तातडीने शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. नंतर तेथून पुढे अधिक उपचारासाठी ठाणे येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी रवी पाटील यांच्या फिर्यादीवरून शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरू झाला आहे.

First Published on: April 18, 2019 4:53 AM
Exit mobile version