राष्ट्रवादी काँग्रेसला मुरबाडमध्ये खिंडार; ठाणे जि.पचे उपाध्यक्ष सुभाष पवार शिवसेनेत

राष्ट्रवादी काँग्रेसला मुरबाडमध्ये खिंडार; ठाणे जि.पचे उपाध्यक्ष सुभाष पवार शिवसेनेत

सुभाष पवार यांचा शिवसेना प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेसला मुरबाड तालुक्यात खिंडार पडले असून, ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुभाष पवार यांनी हजारो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना भवनात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला. मुरबाडची चार टर्म आमदारकी भूषविलेल्या गोटीराम पवार यांचे सुभाष हे पुत्र आहेत. यावेळी ठाण्याचे पालकमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, शिवसेनेचे सचिव आणि खासदार अनिल देसाई, राज्य हातमाग महामंडळाचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, आमदार रुपेश म्हात्रे, शांताराम मोरे, माजी आमदार पांडुरंग बरोरा आदी उपस्थित होते.

स्थानिक पदाधिकारीही शिवसेनेत

विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने पक्षांतराचे वेध अनेकांना लागले आहेत, तर त्यांना आपल्या पक्षात खेचण्यासाठी शिवसेना भाजपमध्ये स्पर्धा लागल्याचे दिसून येत आहे. सुभाष पवार यांच्यासोबत जिल्हा परिषदेच्या कृषी व पशूसंवर्धन समितीचे सभापती किशोर जाधव, समाजकल्याण समितीच्या सभापती संगीता गांगड, भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती इरफान भुरे, मुरबाड बाजार समितीचे सभापती चंद्रकांत बोष्टे, जिल्हा परिषदेचे सदस्य प्राजक्ता भावार्थे, दिपाली झुगरे, किसन गिरा, निखिल पांडूरंग बरोरा, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुरबाड तालुकाध्यक्ष रामभाऊ दळवी, कल्याण तालुकाध्यक्ष चंद्रकांत गायकर, रवींद्र टेंबे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. माजी आमदार गोटीराम पवार यांनी २००९ मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून बाहेर पडून अपक्ष उमेदवार निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांनी तब्बल ५० हजार मते मिळविली होती. मात्र, त्यांचा निसटता पराभव झाला. त्यानंतरच्या निवडणुकीतही मुरबाड विधानसभा मतदारसंघातून मुरबाड तालुक्यातून त्यांनी आघाडी मिळाली होती.

म्हणून राष्ट्रवादीचं नुकसान!

मुरबाड तालुक्यात गोटीराम पवारांना मानणारा मोठा वर्ग असून, तो आता शिवसेनेच्या मागे आल्याने शिवसेनेची ताकद मजबूत झाली आहे. ठाणे जिल्हा परिषदेत पावणेदोन वर्षांपासून शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी आहे. त्यात सुभाष पवार यांनी उपाध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे. यापूर्वी पवार यांनी मुरबाड पंचायत समितीचे सभापतीपद भूषविले होते. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ते संचालक आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यातील विविध सहकारी संस्थांमध्ये ते कार्यरत आहेत. त्यामुळे पवार यांच्या प्रवेशाने मुरबाडमध्ये राष्ट्रवादीला धक्का बसला आहे.

First Published on: August 31, 2019 8:41 PM
Exit mobile version