ठाणे महापालिकेत विविध विभागात २,५०० पदे रिक्त

ठाणे महापालिकेत विविध विभागात २,५०० पदे रिक्त

ठाणे महापालिका

देशातील एक महत्त्वाची महापालिका असा लौकिक असणाऱ्या ठाणे महापालिकेत विविध संवर्गातील तब्बल अडीच हजारांहून अधिक पदे रिक्त असल्याचे बुधवारी महासभेत एका प्रश्नाच्या उत्तरातून स्पष्ट झाले.

गेली अनेक वर्ष भरतीच नाही

गेली अनेक वर्षे महापालिका प्रशासनाने भरती प्रक्रिया राबवली नाही. एखादा कर्मचारी निवृत्त झाला की ते पद रिक्त ठेवून त्याचा भार इतर कर्मचाऱ्यांवर टाकला जातो. प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर त्याचा परिणाम झाला आहे. नागरिकांना सुविधा देताना त्यामुळे अडचणी येत आहेत. काही कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त भार येत असल्याने त्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम झाला आहे.

विविध संवर्गातील २५३० पदे रिक्त

बुधवारच्या महासभेत या विषयावर सविस्तर चर्चा झाली. प्रशासनाने दिलेल्या महितीनुसार सध्या महापालिकेत विविध संवर्गातील २५३० पदे रिक्त आहेत. या प्रश्नावरील चर्चेदरम्यान लोकप्रतिनिधींनी किती अधिकाऱ्यांवर अतिरिक्त कार्यभार आहे, असे विचारले. त्यावर प्रशासनाला समाधानकारक उत्तर देता आले नाही. संपूर्ण संगणकीकरण कारभार असलेल्या महापालिका प्रशासनाला या साध्या प्रश्नाचे उत्तर देता येऊ नये, याबाबत लोकप्रतिनिधींनी आश्चर्य व्यक्त केले. तसेच यानिमित्ताने प्रशासनाने संगणकीकरण कारभाराची उपयुक्तता तपासावी, असा आग्रहसुद्धा धरला. प्रशासनानेही तसा आढावा घेण्याची सूचना मान्य केली.

५१२ पदे भरणार

पहिल्या टप्प्यात महापालिका प्रशासनातील ५१२ पदे सरळ सेवा पद्धतीने भरली जातील. त्यासाठी शासन नियमानुसार परीक्षा घेणार आहे. येत्या एक ते दीड वर्षात ही प्रक्रिया पार पडेल, अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

First Published on: June 19, 2019 8:36 PM
Exit mobile version