आजपासून मुंबईतून देशांतर्गत विमानसेवा

आजपासून मुंबईतून देशांतर्गत विमानसेवा

मुंबईतून देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्यास अखेर राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे सोमवारपासून मुंबईतून रोज २५ विमानांची वाहतूक होणार आहे. तशी माहिती राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. मुंबईतील करोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे राज्य सरकारने सोमवारपासून मुंबईतून सुरू होणार्‍या देशांतर्गत विमानसेवेला परवानगी नाकारली होती. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रेड झोनमधून विमान वाहतूक धोकादायक असल्याचे सांगत त्याला विरोधही दर्शवला होता. विमानसेवेमुळे करोना रुग्णांची ये-जा होऊ शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली होती. त्यावर मलिक यांनी ते त्यांचं व्यक्तिगत मत असल्याचे सांगत, राज्यात बसेस आणि इतर वाहतूक सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे विमानसेवेला सुरुवात होण्यास काहीच अडचण नसावी, असे मलिक म्हणाले.

मात्र, रविवारी झालेल्या बैठकीत मुंबईतून देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे मुंबईच्या विमानतळावर देशांतर्गत विमानांचे टेक ऑफ आणि लँडिंग होणार आहे. तसेच दररोज २५ विमानांचे उड्डाण करण्यात येणार असून हळूहळू ही संख्या वाढवण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

दरम्यान, राज्य सरकार २५ विमानांचे दररोज उड्डाण होणार असल्याचे सांगत असले तरी विमान कंपन्यांना अद्याप नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडून कोणतीही सूचना आलेली नाही. विमानतळ हा केंद्राचा विषय असल्याचे मतही विमान कंपन्यांनी व्यक्त केले. मात्र, सोमवारी मुंबईहून ६४ उड्डाणासाठी बुकिंग सुरूच असल्याचे कंपन्यांनी सांगितले.

First Published on: May 25, 2020 4:58 AM
Exit mobile version