महापौर निधीतून गरजू रुग्णांना १५ ते २५ हजार रुपयांची मदत

महापौर निधीतून गरजू रुग्णांना १५ ते २५ हजार रुपयांची मदत

विश्वनाथ महाडेश्वर

कर्करोग, किडनीसह ह्रदयरोगासारख्या दुर्धर आजारांवरील उपचारांसाठी मुंबई महापालिकेच्या वतीने महापौर निधीतून रुग्णांना आर्थिक मदत केली जाते. सध्या या उपचारांसाठी महापौर निधीतून केवळ ५ हजार रुपये एवढीच मदत करण्यात येते. परंतु, या आजारांवरील उपचारासाठी होणाऱ्या खर्चाची रक्कम पाहता ही मदत तुटपुंजी आहे. त्यामुळे या निधीच्या रकमेत वाढ करत १५ ते २५ हजार रुपये एवढी मदत करण्याचा निर्णय महापालिका सभागृहात घेण्यात आला. त्याबरोबरच महापालिकेच्या सर्व नगरसेवकांनी एक महिन्याचे मानधन महापौर निधीला देण्याचे आवाहन महापौरांनी करत महापौर निधी पदावरुन बाजूला होण्याच्या आधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

वेतन देण्याचं महापौरांचं आवाहन

मुंबई महापालिकेच्या वतीने देण्यात येणार्‍या महापौर निधीतून लाभ मिळवण्यासाठी कर्करोग, किडणी, ह्रदयरोग रुग्णांकडून मोठ्या संख्येने अर्ज येत असतात. परंतु, आतापर्यंत किडनी आणि ह्रदय रोपण तसेच कर्करोग आणि डायलेसिसच्या उपचारांकरता पाच हजार रुपयांची आर्थिक मदत महापौरांच्या निधीतून केली जाते. परंतु, ही रक्कम आधीच कमी आहे. त्यातच रुग्णांकडून अर्ज येत असल्याने त्यासाठी असलेल्या निधीचीही कमतरता पडत असते. त्यामुळे मागील वर्षी विद्यमान महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी या महापौर निधीत जास्तीत जास्त वाढ करण्यासाठी आणि या निधीचा वापर गरीब, गरजू रुग्णांसाठी करण्यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी त्यांचे एक महिन्याचे मानधन आणि महापालिका कर्मचाऱ्यांनी त्यांचे एक दिवसाचे वेतन महापौर निधीला भेट देण्याचे आवाहन केले होते.

महापौरपदी असतानाची शेवटची बैठक

सध्या देण्यात येणार्‍या ५ हजार रुपयांच्या आर्थिक मदतीच्या तुलनेत ह्रदयरोपण, ह्रदय शस्त्रक्रिया, तसेच किडणीरोपण या शस्त्रक्रियांसाठी रुग्णांना प्रत्येकी २५ हजार रुपयांची तर डायलेसिसच्या रुग्णांसाठी १५ हजार रुपयांची आर्थिक मदत करण्याचा निर्णय या समितीच्या वतीने घेण्यात आला होता. त्यामुळे यासाठी महापौर निधीत वाढ करून ती रक्कम ५ कोटींपर्यंत करण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. गटनेत्यांच्या सभेत याबाबतचा प्रस्ताव मंजूर करण्यात आल्यानंतर महापालिका सभागृहापुढे मुंजरीसाठी ठेवण्यात आला होता. परंतु, महापौर पदाच्या आपल्या शेवटच्या बैठकीत महापौरांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यामुळे गरीब आणि गरजू रुग्णांना आता उपचारांसाठी वैद्यकीय मदत निधी १५ ते २५ हजारांपर्यंत उपलब्ध होणार आहे.

महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी हा प्रस्ताव मंजूर करतानाच सर्व नगरसेवकांना आपल्या एक महिन्याच्या मानधनाची रक्कम महापौर निधीला देण्याचे आवाहन केले. याबाबत जे नगरसेवक आपले मानधन महापौर निधीला देणार आहेत, त्यांनी आपले संमतीपत्र महापालिका चिटणीस विभागाला सादर करावे, अशाही सूचना त्यांनी केल्या आहेत.

First Published on: November 15, 2019 8:21 PM
Exit mobile version