कळवा नाका येथील छत्रपतींच्या पुतळ्याकडे ठामपाचे दुर्लक्ष

कळवा नाका येथील छत्रपतींच्या  पुतळ्याकडे ठामपाचे दुर्लक्ष

Statue of Chhatrapati Shivaji Maharaj

तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते स्थानिक आमदार निधीतून कळवा नाका येथे २८ डिसेंबर २०१३ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता. मागील दोन वर्षांपासून या पुतळ्याच्या समोर सुरु असलेल्या कळवा पुलाच्या बांधकामामुळे या पुतळ्यासह परिसराची अत्यंत दुरवस्था झाली आहे. या पुतळ्यावर प्रचंड धूळ साचली आहे. पुलाच्या बांधकामाचे साहित्य पुतळ्याच्या आजूबाजूला अस्ताव्यस्त पडलेले आहे. या ठिकाणाहून नागरिकांना जाण्यायेण्यासाठीही प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

दोन-तीन वर्षांच्या कालखंडात या पुतळ्याची व्यवस्थित निगा राखली गेलेली नाही. त्यामुळे या पुतळ्यावर सध्या धूळ साचलेली दिसून येते. शहरातील सर्व पुतळे आणि त्यांचा परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी ही महानगरपालिकेची असतानाही ठाणे महानगरपालिका याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप कळव्यातील नागरिकांनी केला आहे. मागील दोन-तीन वर्षांपासून या पुतळ्याची कोणत्याही प्रकारची रंगरंगोटी अथवा स्वच्छता केली नसल्याचेही स्थानिक नागरिकांनी सांगितले.

छत्रपती शिवरायांच्या नावावर आपली सत्ता चालवणारे त्यांच्या प्रतिमांकडे मात्र दुर्लक्ष करीत आहेत. नवी मुंबईहून ठाणे मार्गे मुंबईकडे जाणार्‍या या प्रमुख मार्गावर हा पुतळा विराजमान आहे. लाखो लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या या पुतळ्याबाबतची दुरवस्था आम्ही ठाण्याच्या महापौरांना सांगितली आहे. त्यांनी पुतळ्याची त्वरित साफसफाई करून त्याची योग्य निगा राखण्याचे आदेश दिले आहेत. मात्र आदेशाची अंमलबजावणी तात्काळ झाली नाही तर यासाठी आंदोलन करण्यात येईल.
– प्रेम प्रधान, कोपरी.

First Published on: December 12, 2018 5:52 AM
Exit mobile version