निर्बंध उठल्यावर आयुष्य कित्येक पटीने गतिमान होण्यासाठी विकासकामे फायदेशीर; मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

निर्बंध उठल्यावर आयुष्य कित्येक पटीने गतिमान होण्यासाठी विकासकामे फायदेशीर; मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) आजपासून डहाणूकरवाडी ते आरे मेट्रो स्टेशनदरम्यान चाचणी सुरू झाली आहे. एमएमआरडीए यलो लाइन २ ए आणि रेड लाइन ७ वर चाचणीला यानिमित्ताने सुरूवात झाली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत आकुर्ली स्थानकात मेट्रो चाचणीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. त्याचबरोबर, छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (सीएसएमआयए) टर्मिनल १ (टी १) आणि टर्मिनल २ (टी २) ला पोहोचण्यासाठी एमएमआरडीएकडून भुयारी आणि उन्नत मार्ग प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. तसेच ठाण्याच्या दुर्गाडी आणि राजनोली या दोन उड्डाणपुलांचे ई-लोकार्पणही मुख्यमंत्र्यांनी केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी या विविध विकासकामांविषयी आपले मतही मांडले.

वेग मंदावला असला तरी कामे थांबली नाहीत 

कोरोनामुळे जग ठप्प असतानाही कामाचा वेग मंदावला असला तरी कामे थांबली नाहीत. मात्र, काहींना प्रश्न पडेल की निर्बंध असताना या विकासकामांविषयी बोलून उपयोग काय? परंतु, हे निर्बंध उठतील, तेव्हा पूर्वीपेक्षा अधिक जोमाने, कित्येक पटीने आपले आयुष्य गतिमान होण्यासाठी म्हणून ही कामे आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

मुंबई वाढत चाललेली आहे

आम्ही वांद्रे परिसरात १९६६ मध्ये राहण्यास आलो. त्यावेळी सगळीकडे तिवराची जंगले होती. परंतु, आता मुंबई वाढत चाललेली आहे. उंच इमारती उभ्या राहत आहेत. परंतु, या इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांच्या येण्या-जाण्याची सोय कशी करायची हा प्रश्न होता. त्यामुळे रस्त्यांवर रस्ते, रस्त्यांवर उड्डाणपूल अशी विविध विकासकामे करत आहोत आणि आपला वेग कायम राखत आहोत, असेही ठाकरे म्हणाले.

प्रत्येक काम आखीव-रेखीव

मला आता मुंबई जो वेग घेते आहे, त्याचा अभिमान आहे. मला या वेगात मुख्यमंत्री म्हणून सहभागी होता आले, हे माझे भाग्य आहे. तसेच नुसती कामे होत नसून मेट्रोचे प्रत्येक काम आखीव-रेखीव आहे, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीएमएमआरडीएचे आयुक्त आर. ए. राजीव यांचे कौतुक केले. मेट्रोचे स्टेशन बघितल्यावर हे मुंबईत आहे यावर विश्वास बसत नाही. ही स्टेशन एखाद्या परदेशातील स्टेशनपेक्षा कमी नाहीत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

First Published on: May 31, 2021 3:38 PM
Exit mobile version