जस्टीस बी जे लोया प्रकरणाला नवे वळण…

जस्टीस बी जे लोया प्रकरणाला नवे वळण…

जस्टीस बी जे लोया मृत्यू प्रकरण

जस्टीस बी जे लोया प्रकरणाला पुन्हा नवे वळण मिळाले. जस्टीस लोया यांच्या मृत्यू संदर्भातील प्रकरण सुप्रीम कोर्टाने जरी फेटाळून लावले असले, तरी या प्रकरणी एक नवी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. जस्टीस लोया हे त्यांच्या सहकारी जस्टीस स्वप्ना जोशी यांच्या मुलीच्या लग्नासाठी नागपूरला गेल्याचे राज्य सरकार सांगत असले, तरी जसिस्ट लोया हे शासकीय कामानिमित्त नागपूरला आले होते असा दावा करणारी याचिका आज मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली.

लोया कुटुंबियांना नुकसान भरपाई द्या

अॅड. सतीश उके आणि अशोक पै या दोघांनी ही याचिका दाखल केली असून, या याचिकेद्वारे जस्टीस लोया यांच्या नागपूर दौऱ्यासंदर्भात पाठवलेल्या पत्राचा आधार घेण्यात आला आहे. यात राज्य शासनाने त्यांना शासकीय कामावर पाठवले असून, शासकीय कामावेळी त्यांचा मृत्यू झाला असल्याचे म्हटलंय. त्यामुळे लोया यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी द्यावी. तसंच लोया यांच्या कुटुंबाला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. राज्य सरकारला या दोन्ही गोष्टी शक्य नसल्यास त्यांनी एक सरकारी बँक खाते उघडून द्यावे जेणेकरून सामान्य जनतेकडून बँक खात्यात पैसे जमा करून त्यांच्या कुटुंबियाला मदत केली जाईल, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.

शासकीय कामावेळी लोयांचा मृत्यू

नागपूर येथील रविभवनमधील व्हीआयपी सूट आरक्षित करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नागपूरमधील कार्यकारी अभियंत्यांनी ३० नोव्हेंबर आणि १ डिसेंबर या दिवशी एक पत्र लिहिले होते. जस्टीस लोया यांच्यासाठीच हा सूट आरक्षित करण्यात आला होता. पण वस्तुस्थितीत या कागदपत्रांच्या बाबतीत छेडछाड केली जाऊन सुप्रीम कोर्टात राज्य शासनाकडून जस्टीस लोया यांच्या मृत्यू संदर्भात वेगळाच पक्ष ठेवण्यात आल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे.

असा झाला लोया यांचा मृत्यू

दरम्यान, ३० डिसेंबर २०१४ मध्ये न्यायमूर्ती लोया एका लग्नसमारंभासाठी नागपुरात आले होते. त्यावेळी ते रविभवन या शासकीय निवासस्थानात थांबल्याचं सांगितलं जातं. मध्यरात्री तीनच्या सुमारास त्यांच्या छातील अचानक दुखायला लागलं आणि त्यांची तब्येत अचानक बिघडली. त्यांच्यासोबत असलेले दोन वरिष्ठ न्यायमूर्ती त्यांना शासकीय रूग्णालयात घेऊन गेले. त्याठिकाणी ईसीजी काढल्यावर मेडिट्रिना या खासगी रूग्णालयात त्यांना पाठवण्यात आले. या रूग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या मृतदेहाचे शासकीय रूग्णालयात नेऊन शवविच्छेदन करण्यात आले, असा घटनाक्रम पोलीस तपासात सांगतात.

First Published on: June 7, 2018 1:39 PM
Exit mobile version