Thackeray Film: बाळासाहेबांच्या आठवणींचा नवा व्हिडिओ

Thackeray Film: बाळासाहेबांच्या आठवणींचा नवा व्हिडिओ

हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित एक हिंदी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॉलीवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने चित्रपटात बाळासाहेबांची मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. मध्यंतरी रिलीज झालेल्या चित्रपटाच्या टिझरला उभ्या महाराष्ट्रातून भरभरुन पसंती मिळाली होती. लोकांनी सोशल मीडियाद्वारे टिझर आणि नवाजुद्दीनच्या अभिनयावर कौतुकाचा वर्षाव केला होता. आता प्रेक्षकांना आणि बाळासाहेंबांच्या चाहत्यांना प्रतिक्षा आहे ती ‘ठाकरे’ चित्रपटाच्या ट्रेलरलची. येत्या २६ डिसेंबरला ‘ठाकरे’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होणार आहे. दरम्यान, याच संदर्भातला एक व्हिडिओ नुकताच प्रसारित करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर बाळासाहेब ठाकरेंविषयीच्या आठवणी सांगताना दिसतो आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होतो आहे.

सचिन तेंडुलकर म्हणतो…

व्हिडिओमध्ये बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देत सचिन म्हणतो, ‘आम्ही शिवाजी पार्कवर क्रिकेटचा सराव करायचो तेव्हा ज्यावेळी बाळासाहेब ठाकरेंची सभा होणार असेल त्यावेळी लोकांमध्ये एक निराळाच उत्साह असे. तिथलं संपूर्ण वातावरण त्यांच्या येण्याने भारलेलं असायचं. भाषण ऐकण्यासाठी लोक आतूर असायचे आणि त्यांच्या भाषणाची तयारीही अत्यंत उत्साहात चालयची. मी जेव्हा जेव्हा बाळासाहेब ठाकरेंची भेट घेतली तेव्हा प्रत्येकवेळी बाळासाहेबांनी मला सांगितलंय की, देशाला गौरव वाटेल असाच खेळ. तुझा सगळ्या देशाला अभिमान आहे.’ त्यांचे ते शब्द मी नेहमी आशीर्वादाप्रमाणे मानायचो आणि तसंच खेळण्याचा प्रयत्न करायचो असंही सचिनने व्हिडिओमध्ये सांगितलं आहे.

बाळासाहेब ठाकरे महान व्यक्तिमत्व

या खास व्हिडिओमध्ये खासदार संजय राऊत, अभिनेता अजिंक्य देव आणि इतर काही शिवसैनिकांच्या प्रतिक्रियाही नोंदवण्यात आल्या आहेत. बाळासाहेब ठाकरे हे काय करीश्मा होता याविषयी हे सगळे बोलताना दिसत आहेत.  बाळासाहेब ठाकरेंचा आवाज हा सत्यासाठी आणि हक्कासाठी होता असे अभिनेता अजिंक्य देव सांगतो आहे. महिला आणि त्यांचा आवाज ही शिवसेनेची ताकद आहे असे बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगत अशी आठवण एका शिवसेना महिला कार्यकर्तीने सांगितली आहे. या व्हिडिओला युट्यूब आणि अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर तूफान पसंती मिळत आहेत. आता ठाकरे सिनेमाचा ट्रेलर कसा असणार? याचीही उत्सुकता अधिकच ताणली गेली आहे. दरम्यान, या सर्व प्रतिक्रियांसोबतच बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणामधले काही छोटे छोटे नमुनेही व्हिडिओमध्ये दिसत आहेत. हा चित्रपट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी म्हणजेच २३ जानेवारी २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे.

First Published on: December 21, 2018 6:21 PM
Exit mobile version